Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या दोन दिवसांनपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कोकण, विदर्भ, मुंबई आणि पुण्यात काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, आज देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकणातील रायगड, रत्नागिरी, तर मध्य महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात आणि विदर्भात पावसाचा जोर आजही कायम राहणार आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज नागपूर, गडचीरोली, चंद्रपूर, कोकणातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार आज ओरिसा किनारपट्टीवर असलेले कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. आज त्याचे रूपांतर ठळक कमी दाबात झाले असून ते आज अंतर्गत ओडिसा व लगतच्या छत्तीसगडच्या भागावर आहे. समुद्र सपाटीवरील दक्षिण गुजरात उत्तर केरळ किनारपट्टी लगत असलेल्या कमी दाबाचा पट्टा स्थिर आहे. दरम्यान आज देखील संपूर्ण राज्यात बहुतेक ठिकाणी ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. आज भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह खूप जोरदार म्हणजेच २४ तासात ११६ ते २०४ मीमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
आज ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग व पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात, तर गोंदिया नागपूरसह रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात जोरदार पावसाची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यात उद्या २३ जुलै रोजी रायगड, रत्नागिरी व पुणे व साताराच्या घाट विभागात २४ जुलै रोजी, पुणे व सातारच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी खूप जोरदार म्हणजेच ११६ मीमी ते २०४ मीमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
आजपासून पुढील पाच दिवस कोकण गोवा विदर्भात बहुतेक ठिकाणी मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर आज मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे व परिसरात पुढील दोन दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या