Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. मॉन्सून राज्यात पुन्हा सक्रिय झाला आहे. राज्यातील काही जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. आज, मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांना यलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मुंबईतही पावसाचा जोर वाढणार आहे. आज पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांना देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तर, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, व विदर्भातील अकोला, बुलढाणा, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, वर्धा या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुण्यात आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात आज आकाश सामान्यत: ढगाळ राहणार आहे. तर वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात २६ तारखे पर्यन्त पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुण्याच्या घाट विभागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यात मध्यरात्री जोरदार पाऊस झाला.
मुंबईत देखील पावसाने पुनरागमन केले आहे. मुंबईला देखील आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.पुणे वेध शाळेने दिलेल्या महितीनुसार उत्तर भारतातील व लगतच्या भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आज त्याच ठिकाणी स्थिर असून यामुळे राज्यातील काही जिल्ह्यात पुढील काही दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण पुढील सात दिवस बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पुढील दोन ते तीन दिवस बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.