Maharashtra Weather Update : राज्यात उन पावसाचा खेळ सुरू आहे. विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट आली आहे. बहुतांश जिल्ह्यात तापमान हे ४० च्या पुढे गेले आहे. राज्यात अकोला सर्वाधिक हॉट ठरले आहे. या ठिकाणी सर्वाधिक ४५.६ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तापमान हे ४१ डिग्री सेल्सिअसच्या पुढे आहे. अकोल्यात उन वाढल्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कलम १४४ लागू करणे म्हणजे संचारबंदी किंवा लॉकडाऊन नाही, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहे. ही संचारबंदी ३१ मे पर्यंत राहणार आहे. दरम्यान, कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रातील पुढील पाचही दिवस आणि मराठवाडा व विदर्भात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. आज विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भातील अकोला जिल्ह्यात आजपासून पुढील पाचही दिवस चंद्रपूर जिल्ह्यात आजपासून पुढे चार दिवस तर तर मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार व जळगाव आणि विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग व मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील पाच दिवस आणि कोकणातील ठाणे व मुंबई येथे २७ ते २९ मे रोजी काही ठिकाणी मेघ गर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज २६ मे रोजी बीड लातूर नांदेड येथे तुरळक ठिकाणी मेघ गर्जना आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्यात देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे ग्रामीण व पुणे शहर व परिसरात आज आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्या पुढील चार दिवस हवामान ढगाळ राहून आकाश सामान्यतः ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नैऋत्य पावसाने आज दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग मध्य बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग आणि उत्तर पूर्व बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला आहे.
विदर्भात शनिवारी अकोला ४५.६, अमरावती ४४.४, बुलढाणा ४०.६, ब्रम्हपुरी ४४.०, चंद्रपुर ४३.४, गोंदिया ४०.२, नागपुर ४१.७ , वाशिम ४३.३, वर्धा ४४, यवतमाळमध्ये ४५ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
संबंधित बातम्या