Maharaashtra Weather Update : नैऋत्य मौसमी पावसाने आज दक्षिण अरबी समुद्र व मालदिवचा आणखी काही भाग व्यापला आहे. नैऋत्य मौसमी वारे तीन चार दिवसात केरळमध्ये दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. कोकण गोव्यात पुढील पाच दिवस, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात आज आणि ३१ मे व एक जून रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील अकोला आणि चंद्रपूर येथे काही भागात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील नागपूर व वर्धा येथे आज व उद्या चंद्रपूर येथे आज व दिनांक २९ व ३० रोजी तसेच आज अमरावती व उद्या अकोला येथे काही भागात उष्णतेची दाट देण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात पुढील पाच दिवस मेघ गर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर व सातारा, मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धारशिव येथे येथे मेघ गर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३१ मे व १ जून रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे शहर व परिसरात आज पासून पुढील पाच दिवस आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांन पासून तापमानात मोठी घट झाली आहे. पुण्याचे तापमान मंगळवारी ३५ डिग्री सेल्सिअस नोंदवल्या गेले. आज देखील पुण्यात काही भागात हवामान ढगाळ राहणार असून तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गेल्या काही तासांत मोसमी वाऱ्याचा वेग मंदावला आहे. गेल्या दोन चार दिवसांपासून मोसमी वाऱ्यांनी फारशी प्रगती केली नसली तरी चिंतेचे कारण नाही, मोसमी पाऊस केरळमध्ये वेळेत दाखल होईल व त्या पुढील वाटचालही नियोजित वेळेनुसार होईल, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे.
संबंधित बातम्या