Maharashtra Weather Update : राज्यात तापमानात बरेच चढ आणि उतार दिसून येत आहे. अवकाळी पासवासह राज्यात आता तापमानात वाढ होणार आहे. राज्यातील काही जिल्ह्यात हवामान विभागाने हीट वेव्हचा अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज व उद्या उत्तर कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई व रायगड जिल्ह्यामध्ये हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. तर उद्यापासून पुढील तीन दिवस उत्तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव व नाशिक आणि विदर्भातील अकोला जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. यामुळे या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या सोबत काही जिल्ह्यांत अवकाळी पाऊस देखील होण्याची शक्यता आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार वातावरणाच्या खालच्या स्तरात असलेली द्रोणीका रेषा हरियाणा व लगतच्या भागावर असलेल्या चक्रीय स्थिती पासून मराठवाड्यापर्यंत जात आहे. त्यामुळे आज २२ मे रोजी उत्तर मध्य महाराष्ट्र व पूर्व विदर्भ वगळता दक्षिण कोकण व उर्वरित मध्य महाराष्ट्र ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे मेघगर्जना विजांचा कडकडाट तसेच पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात आणि पश्चिम विदर्भात ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे, मेघगर्जना विजांचा कडकडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
२३ मे रोजी दक्षिण मराठवाड्यातील आणि पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात ३० ते ४० किलोमीटर वेगाचे वादळे वारे, मेघ गर्जना, वीजांचा कडकडाट आणि तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. २४ आणि २५ मे रोजी तळ कोकण व कोल्हापूर जिल्हा वगळता राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
पुणे आणि परिसरात आज व उद्या आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर मेघगर्जना, वीजांचा कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या दोन दिवसांत मात्र आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
नैऋत्य मौसमी वाऱ्यांचा प्रवास संथ गतीने कायम असून त्याचा प्रवास हा आग्नेय अरबी समुद्राचा काही भाग मालदीव व अंदमान निकोबार बेटावरून वाहण्यासाठी स्थिती चांगली आहे. येत्या काही दिवसांत मॉन्सून हा देशात दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे.