Maharashtra Weather update : राज्यात आज रविवारपासून पावसाची शक्यता आहे. रविवारी (२ जून) विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला ५ जूनपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भात चंद्रपूर, नागपूर, वर्धा जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उर्वरित जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेगगर्जना व विजांचा कडकडाट व ताशी ४० ते ५० किमी वेगाच्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाच जूनपर्यंत विदर्भात बहुतांश जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
देशात नैऋत्य मोसमी पाऊस हा कालच्या जागीच कायम आहे. त्यांची वाटचाल संथगतीने होत आहे. पुढील दोन ते तीन दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस मध्य अरबी समुद्राचा आणखी काही भाग व दक्षिण अरबी समुद्र लक्ष्यद्वीप व केरळचा काही भाग तर कर्नाटक रॉयल सीमेचा काही भाग आणि तमिळनाडू व नैऋत्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात दाखल होण्यास अनुकूल परिस्थिती आहे.
पुढील पाच दिवस कोकण गोव्यात हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात आज हवामान कोरडे राहील तर उद्यापासून पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण गोव्यात १, २ व ३ जूनला तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहील. तर ४ व ५ जूनला रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात दोन ते पाच जून बऱ्याच जिल्ह्यात तुरकक ठिकाणी मेघ गर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात २ जून ते ५ जून नांदेड लातूर धाराशिव येथे तर तीन व चार जूनला बीड जिल्ह्यात ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडात व ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
विदर्भात आज बऱ्याच जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तसेच काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात उद्या दोन जूनला चंद्रपूर नागपूर वर्धा जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर उर्वरित जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेगगर्जना व विजांचा कडकडाट व ताशी ४० ते ५० किमी वेगाच्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पाच जूनपर्यंत विदर्भात बहुतांश जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ४० ते ५० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आले आहे.
पुणे आणि परिसरात आज आणि उद्या आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी अंशतः ढगाळ हवामान राहील. ३ तारखे नंतर ७ जून पर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहून मेग गर्जना व विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी (४ जून) कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.