Maharashtra weather update : राज्यभरात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. या वर्षी उन्हाळा हा तीव्र राहणार आहे. राज्यात काही जिल्ह्याचे तापमान हे मोठ्या प्रमानात वाढले आहे. राज्यात सध्या कोरडे हवामान राहणार असून तापमानात देखील वाढ होणार आहे. या सोबतच पावसाचा देखील इशारा देण्यात आला आहे. विदर्भात १६ आणि १७ तारखेला तुरळक ठिकाणी हलका पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मालेगावमध्ये राज्यातील सर्वाधिक ४० अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात सध्या कोरडे हवामान आहे. हिमालयात सक्रिय असलेल्या थंड हवेच्या झंझावाताचा राज्यावर फारसा परिणाम होताना दिसत नाही. विदर्भात काहीसे ढगाळ वातावरण आहे. एक द्रोणीका रेषा म्हणजे कमी दाबाची रेषा उत्तर छत्तीसगड ते उत्तर कर्नाटक पर्यंत आहे. त्यामुळे विदर्भ व लगतच्या भागात काही प्रमाणात आर्द्रता येत आहे. या व्यतिरिक्त १६ मार्चच्या जवळपास वाऱ्यांच्या परस्पर क्रियेमुळे म्हणजे विंड इंटरॅक्शनमुळे तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. एकंदरीत राज्याच्या संपूर्ण भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. या काळात किमान व कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही, असे देखील हवामान विभागाने म्हटले आहे.
पुणे व आजूबाजूच्या परिसरात येथे ४८ तासात मुख्यतः हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पहाटे हलके धुके पडण्याची शक्यता आहे. १४ व १५ तारखेला आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याची शक्यता आहे. हवामान कोरडे राहील. या काळात किमान व कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही.
राज्यात मालेगावमध्ये मंगळवारी सर्वाधिक तापमान नोंदवले गेले. या ठिकाणी पारा हा ४० अंश सेल्सिअस कमाल तापमानावर पोहचला होता. यानंतर सोलापुरात ३९.८, सांगलीत ३८.६, सातारा, कोल्हापुरात ३७.७, पुण्यात ३७.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
विदर्भात चंद्रपूरमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. चंद्रपूरमध्ये पारा हा ३९.४ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर वाशिममध्ये ३९.२, ब्रह्मपुरीत ३८.८, नागपूर येथे ३८.५, वर्ध्यात ३९.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली.
मराठवाड्यात परभणीत ३८.४, उदगीरमध्ये ३७.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. किनारपट्टीवर रत्नागिरीत ३३.६ आणि अलिबागमध्ये ३१.१ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. हर्णे येथे २४.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर डहाणूत २०.७, कुलाब्यात २२.५, सांताक्रुजमध्ये २०.९ अंश सेल्सिअस किमान तापमान होते.