Maharashtra Weather Update : राज्यात आज देखील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अमरावती, भंडारा गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, अकोला जिल्ह्यात गारा पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात इतर ठिकाणी वातावरण कोरडे राहून हवामान उबदार राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्यावर आज कुठलीही खास वेदर सिस्टीम नाही. काल उत्तर तमिळनाडूपासून नैऋत्य मध्य प्रदेशावरील चक्रीय स्थितीपर्यंत असलेली द्रोणीका रेषा किंवा वाऱ्याची खंडितता आज तमिळनाडूपासून छत्तीसगड वर असलेल्या चक्रीय स्थितीपर्यंत कर्नाटक व विदर्भातून जात आहे. तसेच अरबी समुद्रावरील प्रती चक्रीय वारे गरम व अंशतः दमट आर्द्र हवा घेऊन येत आहे. हे वारे विशेषतः गुजरात, कोकण व लगतच्या मध्य महाराष्ट्रात उबदार व दमट हवा घेऊन येत आहे. त्यामुळे राज्यात पुढील दोन ते तीन दिवस आकाश वेळोवेळी ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात ऊबदार वातावरण राहील.
राज्यात कोकण गोव्यात पुढील पाच ते सात दिवस हवामान कोरडे राहील. आज मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व वीजांच्या कडकडाटासह व सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह गारा पडण्याची शक्यता आहे. विदर्भात विशेषतः अमरावती भंडारा गोंदिया नागपूर व वर्धा जिल्ह्यात गारा पडण्याचा अंदाज आहे. उद्या ३१ मार्चला विदर्भात ठिकाणी मेघकर्जना व विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. आज मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी रात्री उबदार वातावरण असेल. तर ३१ मार्च व एक एप्रिलला मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी रात्री उबदार वातावरण असण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढील ७२ तासात काही तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे.
पुणे आणि परिसरात आज आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. ३० आणि ३१ मार्चला आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. ३० व ३१ मार्चला रात्री उबदार वातावरण राहील. १ एप्रिल नंतर आकाश मुख्यतः निरभ्र राहील. एक एप्रिल नंतर मात्र आकाश निरभ्र असल्यामुळे कमाल तापमानात वाढ होईल तर किमान तापमानात घट होईल.
पुण्यात मध्यरात्री अनेक भागात हलका पाऊस झाला. यामुळे वाढत्या उष्णतेपासून पुणेकरांना दिलासा मिळाला. पुण्यात, औंध, बाणेर, कोथरूड, शिवाजीनगर, पाषाण, सुस, सिंहगड परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. यामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला होता.
संबंधित बातम्या