Maharashtra Weather Update: राज्यात थंडीची लाट आली आहे. दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात फेंगल चक्रीवादळ तयार झाल्यामुळे महाराष्ट्रातून आर्द्रता आणखी कमी होणार असून त्यात पुढील २४ तासांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. पुण्यात वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. तर जळगाव शहरात देखील तापमानात मोठी घट झाली आहे. त्यामुळे येथील नागरिक गारठले असून थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्यांचा आधार घेतांना नागरिक दिसू लागले आहेत.
हवामान विभागाने दिलेल्या माहीनुसार २७ पुण्यात नोव्हेंबर रोजी रात्रीचे तापमान ९.९ अंश सेल्सिअस होते. या वर्षीचे हे पहिलेच एक अंकी किमान तापमान होते. अधिकृत माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात फेंगल चक्रीवादळ तयार झाल्यामुळे महाराष्ट्रातून आर्द्रता कमी होणार असून थंडी आणखी वाढणार आहे. या वादळामुळे पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे काही राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या भागाला थंडीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र व विदर्भात देखील थंडी वाढली आहे.
मुंबई, ठाणे, उपनगर, नवी मुंबई, पालघर, रायगडमध्ये व पुण्यात गेल्या काही वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद बुधवारी झाली आली. हवेत गारवा वाढला असून पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, लोणावळा, शिरुर, भागात तापमान 10 अंशांवर आले होते.
आयएमडीच्या आकडेवारीनुसार पुण्यात राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात कमी किमान तापमान नोंदवले गेले, तर सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे ९.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुण्यातील किमान तापमान सरासरीपेक्षा २.९ अंश सेल्सिअसने कमी होते. महाराष्ट्रातील लोकप्रिय हिल स्टेशन असलेल्या महाबळेश्वरपेक्षाही हे प्रमाण कमी होते. महाबळेश्वरयेथे किमान तापमान ११.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले. हवेली आणि एनडीएसह अन्य भागात अनुक्रमे ९.१ आणि ८.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुण्यात कमाल तापमान २८.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. शहरातील तापमानही सरासरीपेक्षा कमी आहे. अधिकृत अंदाजानुसार, पुणे शहरात ३ डिसेंबरपर्यंत प्रामुख्याने आकाश निरभ्र राहील. या काळात तापमान खालच्या पातळीवर कायम राहणार असून सकाळच्या वेळी शहरात धुके जाणवण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही थंडी वाढली आहे. पुढील दोन दिवस तापमान आणखी कमी होण्याची शक्यता आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कडाक्याची थंडी पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये तापमान मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. येथील पारा हा 8.3 अंशावर आला आहे. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भाग गारठला आहे.
आयएमडी पुणेचे हवामान व अंदाज विभागाचे माजी प्रमुख अनुपम कश्यपी म्हणाले, 'दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा 'फेंगल' चक्रीवादळात तयार होण्याची शक्यता आहे. ते उत्तर-वायव्येकडे सरकणार आहे. याचा फटका तामिळनाडू, रायलसेमा आणि केरळसह भागांना बसणार आहे. महाराष्ट्रात ढगाळ वातावरण नसले तरी महाराष्ट्र, मध्य भारतातील सापेक्ष आर्द्रता कमी होऊन उत्तरेकडील वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात रात्रीच्या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.