Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर पुढील चार दिवस कमी राहणार आहे. असे असले तरी कोकणात पावसाचा जोर कायम राहणार आहे. येथील काही जिल्ह्यांना यलो तर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. किनारपट्टीसह पश्चिम घाटाच्या परिसरातही पावसाचा जोर कमी राहणार आहे. तर राज्याच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना आज १० आणि उद्या ११ जुलै रोजी यलो तर १२ आणि १३ जुलै ला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघरला पुढील काही दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूरला पुढील दोन दिवस यलो तर त्याच्या पुढील दोन दिवसांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर कमी राहील आज कोकण तसेच पुणे, सातारा, विदर्भ व मराठवाड्यातील जिल्ह्यांना यलो अलर्ट तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे, सातारा, आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुढील चार दिवस घाट विभागात पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुण्यात पुढील दोन दिवस घाट विभागासाठी यलो अलर्ट तर १२ आणि १३ तारखेला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर सातारा जिल्ह्यातील घाट विभागात आज आणि उद्या यलो तर १२ आणि १३ तारखेला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर कमी होणार आहे तर १२ आणि १३ तारखेला पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने येथील घाट विभागासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दरम्यान वरील तीन जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मारठवड्यातील लातूर, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, औरंगाबाद, हिंगोली, बीड, जिल्ह्यात पावसाचा जोर कमी राहणार आहे. पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट कामय आहे. पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा तर त्याच्या पुढील दोन दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले, सध्या अरबी समुद्रातील मोसमी पावसाची शाखा सक्रिय आहे. अरबी समुद्रातून बाष्पयुक्त हवा वेगाने किनारपट्टीकडे येत आहे. त्यामुळे किनारपट्टी आणि घाट परिसरात पावसाचा जोर राहील. पण, उर्वरित राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे.