Maharashtra Weather Update : राज्यावरील पावसाचे सावट सध्या दूर झाले आहे. राज्यात पुढील काही दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. या सोबतच तापमानात तीन ते चार अंश डिग्री सेल्सिअसने घट होणार आहे. यामुळे नवीन वर्षात राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, काल दक्षिण पूर्व अरबी समुद्र ते दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत असलेली कमी दाबाची द्रोणीका रेषा आज विरून गेली आहे. महाराष्ट्रातील चारही उपविभागांमध्ये पुढील पाच ते सहा दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे पुढे चार-पाच दिवस किमान तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे.
पुण्यात व परिसररात आज दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. उद्यापासून म्हणजेच ३१ डिसेंबर पासून पुढे तीन-चार दिवस आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तर तापमानात २ ते ३ अंश डिग्री सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे.
राजस्थान व परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या परिसरापासून उत्तर गुजरातपर्यंत हवेचा कमीदाबाच्या पट्ट्याचीही निर्मिती झाली आहे. तर पूर्वेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे आग्नेय अरबी समुद्रापासून दक्षिण महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विरून गेला आहे. दरम्यान, उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडी वाढली आहे. मागील तीन दिवसांमध्ये राज्याच्या काही भागांत गारपीट आणि पाऊस झाला होता. तर पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. सध्या राज्यातील थंडी गायब झाली असली तरी नवीन वर्षाच्या सुरवातीला तापमानात पुन्हा घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
संबंधित बातम्या