Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात तापमानात मोठी घट झाली आहे. या सोबतच मराठवाडा आणि विदर्भात देखील तापमानात घट झाली आहे. सकाळी, संध्याकाळी आणि रात्री कमालीची थंडी जाणवत आहे. यामुळे आता नागरिकांनी कपाटात ठेवलेले गरम कपडे बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस राज्याचे हवामान कोरडे राहणार आहे. तर पूढील पाच दिवस विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मात्र, पाऊस पडण्याची शक्यता नाही.
सध्या मुंबई, ठाण्यात सकाळी गारठा जाणवत आहे. मात्र, दिवसा तापमानात मोठी वाढ झाल्याच दिसत आहे. नागरिक उकड्यामुळे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे कडक्याची थंडी कधी पडणार या प्रतीक्षेत मुंबईकर नागरिक आहेत. सध्या मुंबईचे कमाल तापमान हे ३५ तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस एवढं राहत आहे. तर कोकणात सर्व जिल्ह्यात हवामान स्वच्छ व कोरडे आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या महितीनुसार, पुढील काही दिवस पुण्यात स्वच्छ सूर्यप्रकाश आणि हवामान कोरडे राहणार आहे. पुण्यातील कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १७ अंश सेल्सिअस आहे. नाशिकमध्ये सर्वाधिक थंडी जाणवत असून किमान तापमान १४ अंश सेल्सिअस एवढं नोंदवल गेलं आहे.
विदर्भातील नागपूरमध्ये हवामान ढगाळ आहे. पुढील काही दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान राहणार आहे. तर मराठवाड्यात देखील काही जिल्ह्यात हवामान ढगाळ राहणार आहे तर काही ठिकाणी आकाश निरभ्र राहणार आहे. मराठवाड्यात किमान तापमानामध्ये घट नोंदवली गेली आहे.