Maharashtra Weather Update : बांगलच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यातील वातावरणावर परिमाण होणार आहे. सध्या राज्यातील तापमानात मोठी घट पाहायला मिळत आहे. सकाळी व रात्री थंडी वाढली असल्यामुळे अनेक जिल्हे गारठले आहेत. पुणे, नाशिक, जळगाव, सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात तापमानात कमी झाले आहे. किमान तापमानासोबतच कमाल तापमानात देखील १ ते २ अंशांनी घट झाली आहे. डिसेंबर महिन्यात थंडीत आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार किमान किंवा रात्रीच्या तापमानानंतर आता काही शहरातील कमाल किंवा दिवसाच्या तापमानात लक्षणीय घट होत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार, पुणे शहरातील कमाल तापमान सोमवारी २८.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे आतापर्यंतच्या हंगामातील सर्वात कमी कमाल तापमान होते. दरम्यान, किमान तापमान १२.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे आजपर्यंतच्या हंगामातील सर्वात कमी किमान तापमान आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच पुणे शहराच्या तापमानात चढ-उतार होत आहेत. शहरातील किमान तापमानात घट झाली असून, यापूर्वीचे नीचांकी किमान तापमान १२.२ अंश नोंदले गेले होते. त्यानंतर हळूहळू १३.६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली, सोमवारी तापमान पुन्हा १२.१ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले, जे नोव्हेंबरमधील या हंगामातील सर्वात कमी किमान तापमान आहे.
२३ नोव्हेंबर रोजी कमाल तापमानात ३० अंश सेल्सिअसवरून घसरण झाली आहे, २५ नोव्हेंबर रोजी ते २८.४ अंशांपर्यंत घसरले, जे सामान्य पातळीपेक्षा १.५ अंश कमी होते.
कमी होणारी आर्द्रतेची पातळी आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा महाराष्ट्रातील हवामानावर परिणाम होत आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस तापमान आणखी घट होण्याची शक्यता आहे, असे आयएमडीचे पुण्यातील वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ एस.डी. सानप यांनी सांगितले. या वेळी शहरात पहाटे धुके पडण्याची शक्यता असून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे, असे सानप यांनी सांगितले.
शिवाजीनगर २८.४
पाषाण. २७.०
लोहेगाव २८.५
कोरेगाव पार्क ३०.३
हडपसर २८.८