Maharashtra weather update : राज्यावर सध्या कोणतीही हवामान यंत्रणा कार्यान्वित नाही. मात्र, सातत्याने येणाऱ्या पश्चिमी विक्षोभांमुळे राज्यात पुढील काही दिवस तापमानात मोठी घट होणार आहे. साधारणत: २ ते ३ डिग्री सेल्सिअसने तापमानात घट होण्याचा अंदज पुणे वेध शाळेने वर्तवला आहे. यामुळे विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रात ४ फेब्रुवारी पर्यंत थंडी वाढणार आहे. यानंतर थंडी हळू हळू कमी होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात नाशिक, पुणे, जळगाव, नागपूर, अमरावती, गोंदिया जिल्ह्यात कमी तापमानाची नोंद झाली आहे. तर मुंबईत देखील फेब्रुवारी महिन्यात तापमानात पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे.
सध्या पश्चिम हिमालयावर सतत एकामागून एक पश्चिमी विक्षोभ येत आहेत. सध्या ६२ डिग्री पूर्व रेखांश आणि ३० डिग्री उत्तर अक्षांशापासून एक पश्चिमी विक्षोभ पुढे सरकत असून अजूनही तीव्र जेट्स स्ट्रीमचा प्रभाव उत्तर भारतावर आहे. तसेच एक पश्चिमी विक्षोभ ३ फेब्रुवारीला उत्तर पश्चिम भारतावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात किमान तापमानात जास्त काही बदल होणार नाही. पण, उत्तर मध्य कोकण व उत्तर मध्य महाराष्ट्रात उत्तरेकडून थंड वारे येत असल्यामुळे या भागात ३ फेब्रुवारी पर्यंत कमाल व किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. पुढील पाच ते सात दिवस संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून वेळोवेळी म्हणजेच विशेषतः ३१ जानेवारी व १,२, ३ आणि चार फेब्रुवारीला वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
पुण्यात पुढील ७२ तास आकाश मुख्यतः निरभ्र राहील व पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे. १ , ३ व ४ फेब्रुवारीला आकाश मुख्यतः निरभ्र राहून वेळोवेळी ते अंशत: ढगाळ होण्याची शक्यता आहे. पुढील दोन-तीन दिवस किमान तापमानात अंदाजे तीन डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे व कमाल तापमानातही दोन ते तीन डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढे दोन-तीन दिवस दिवसा थंडी जाणवणार आहे.
मुंबईतून थंडी गायब झाल्या सारखी परिस्थिति असली तरी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत तापमानाचा पारा खाली उतरण्याची शक्यता आहे. मुंबईचे किमान तापमान १५ ते १६ अंशांदरम्यान पोहोचू शकेल. त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा दिलासा मिळणार आहे.
संबंधित बातम्या