Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा लाट ओसरली आहे. तर किमान तापमानात वाढ झाली आहे. राज्यात काही जिल्ह्यात धुके पडत असून दिवसा गरम तर रात्री गारठा जाणवत आहे. हवमान विभागाने पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भात २४ व २५ डिसेंबर रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव नाशिक जिल्ह्यात २६ तारखेला पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम मध्य व लगतच्या नैऋत्य बंगाल उपसागरावर असलेले ठळक कमी दाबाचे क्षेत्र काल संध्याकाळी तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतरित झाले आहे. हे डिप्रेशन बंगालच्या उपसागरावर असून पुढील ते पूर्व ईशान्य दिशेने सरकत आहे. राज्यात पुढील दोन दिवस चारही उपविभागात हवामान कोरडे राहणार आहे. तर काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. २५ आणि २६ डिसेंबरला विदर्भात व उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने धुळे, नंदुरबार, जळगाव व नहिसक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या सोबतच राज्यात पुढील तीन दिवसात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात सर्वाधिक कमी तापमान नागपूर जिल्ह्यात नोंदवले गेले. ११ डिग्री सेल्सिअस किमान तपमानाची नोंद झाली. राज्यात बहुतांशी जिल्ह्यात आज सकाळी ढगाळ हवामान होते. अनेक ठिकाणी धुक्याची चादर पाहायला मिळाली.
देशातील डोंगराळ राज्यांमध्ये सध्या बर्फवृष्टी होत आहे. त्याचबरोबर मैदानी भागातील थंड वारे वाहण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे किमान तापमानात सातत्याने घसरण होत आहे. हिमाचल प्रदेशच्या सखल भागात थंडीच्या लाटेमुळे स्थानिक हवामान विभागाने बिलासपूर, उना, हमीरपूर आणि मंडी जिल्ह्यांमध्ये रविवारी ऑरेंज अलर्ट जारी केला. काश्मीरमध्ये तापमान अजूनही गोठण्याच्या बिंदूच्या खाली होते, मात्र रात्रीचे तापमान वाढल्याने काहीसा दिलासा मिळाला.
हिमाचल प्रदेशातील ताबो येथे उणे ११.६ अंश सेल्सिअस, सुम्दो, कुसुमसेरी आणि कल्पा येथे अनुक्रमे उणे ५.३, उणे ४.८ आणि उणे १.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उना येथे १ अंश सेल्सिअस तर भुंतर येथे १.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. उना हे राज्यातील सर्वात उष्ण ठिकाण ठरले, येथे २३.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली, तर शनिवारच्या २४.५ अंश सेल्सिअसतापमानाची नोंद झाली.
उंचावरील आदिवासी भाग आणि पर्वतरांगांमध्ये थंडीची लाट कायम असून, पारा गोठवण्याच्या बिंदूपेक्षा १४ ते १८ अंशांनी खाली राहिला आहे. मध्यम व उंच टेकड्या, तसेच ओढे व लहान नद्यांमध्ये अनेक ठिकाणी पाईपमधील पाणी साचल्याने पाण्याचा प्रवाह कमी होऊन जलविद्युत निर्मितीवर गंभीर परिणाम झाला.
जम्मू-काश्मीरमध्येही कडाक्याच्या थंडीमुळे पाणीपुरवठा वाहिन्यांमधील पाणी गोठले असून अनेक जलाशयांच्या पृष्ठभागावर बर्फाचा पातळ थर साचला आहे. शनिवारी रात्री श्रीनगरमध्ये उणे ४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, जी आदल्या रात्रीच्या उणे ४.६ अंश सेल्सिअसतापमानाच्या तुलनेत सुमारे चार अंशांनी अधिक आहे. दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथे उणे ४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तर काश्मीरमधील गुलमर्ग येथे उणे ४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गुलमर्ग हे स्कीइंग अॅक्टिव्हिटीसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे.
काश्मीरचे प्रवेशद्वार असलेल्या काझीगुंड येथे उणे ५.२ अंश सेल्सिअस, तर पंपोर भागातील कोनीबल गावात उणे ६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कोनीबल गाव हे खोऱ्यातील सर्वात थंड ठिकाण होते.
राजस्थानच्या काही भागात रविवारी थंडीची लाट कायम असून करौली येथे सर्वात कमी ४.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. जयपूर हवामान केंद्राचे प्रभारी राधेश्याम शर्मा यांनी सांगितले की, राज्यात हवामान प्रामुख्याने कोरडे होते आणि काही ठिकाणी धुके होते.
राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान बाडमेर आणि जालोर येथे २६.२ अंश सेल्सिअस, तर सर्वात कमी किमान तापमान करौली येथे ४.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. संगरिया येथे ५.३ अंश सेल्सिअस, फतेहपूर येथे ५.४ अंश सेल्सिअस, चुरू व अलवर येथे ६.६ अंश सेल्सिअस, श्रीगंगानगर येथे ७ अंश सेल्सिअस, धौलपूर येथे ७.५ अंश सेल्सिअस आणि अंता येथे ७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. इतर अनेक ठिकाणी किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली होते.
राजधानी दिल्लीत रविवारी सकाळी ढगाळ वातावरण होते आणि किमान तापमान ७.३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) आकडेवारीनुसार, हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) शनिवारी ३७० वरून ३९३ किंवा 'अत्यंत खराब' श्रेणीत घसरला. सकाळी साडेआठ वाजता आर्द्रतेचे प्रमाण ९७ टक्के होते, अशी माहिती आयएमडीने दिली. कमाल तापमान २४ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या