Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात असलेले अति तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आज सकाळी साडेपाच वाजता दाना या चक्रीवादळ झाले आहे. हे चक्रीवादळ पूर्व मध्य बंगालच्या उपसागरावर १६.५ डिग्री उत्तर अक्षांश तर ८९.६ डिग्री पूर्व रेखांशावर स्थित आहे. आज सकाळी वादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. दाररम्यान, हवामान विभागाने आज राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या चारही उपविभागांमध्ये आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात आज व उद्या तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात आज काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. विदर्भात सुद्धा आजपासून तीन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र, पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मेघगर्जना व विजांच्या कडकडाट होऊन ३० ते ४० किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये आज मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दाना चक्रीवादळामुळे दक्षिण पूर्व रेल्वेच्या एकूण १७२ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. बहुतांश गाड्या खरगपूर, आद्रा आणि चक्रधरपूर विभागातून धावतील. तर रांची रेल्वे विभागातील सात गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. वादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वत: गुरुवारी दक्षिण पूर्व रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसोबत आढावा बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. संपूर्ण झोनमध्ये १२० मेल-एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्या रद्द करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
तसेच नियंत्रण कक्ष स्थापन करण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे. सॅटेलाईट फोन आणि बीएसएनएल क्रमांक असलेले मोबाइल या ठिकाणी ठेवण्यात येतील, असे निर्देश देण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रवाशांना चालकासोबत वाहनेही ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रेल्वेगाड्यांमध्ये अर्भकांच्या जेवणाची, पाण्याच्या टँकरची व्यवस्था ही करण्यात आली आहे. यामध्ये खरगपूर-पंसकुरा सेक्शन, खरगपूर-भद्रक सेक्शन, तामलुक-हल्दिया सेक्शन, तामलुक-दिघा सेक्शन आणि इतर रेल्वे सेक्शनचा समावेश आहे.
संबंधित बातम्या