Maharashtra Weather Update : राज्यात परतीचा पाऊस अद्याप माघारी फिरलेला नाही. राज्यातील अनेक जिल्ह्यात रविवारी जोरदार पाऊस झाला. पुण्यासह पालघर, ठाणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. राज्यात आज देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज पालघर, ठाणे, धुळे, नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट व हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याने वरील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्यमौसमी पावसाने बिहार, झारखंडच्या उर्वरित भागातून तर पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या पूर्व भागातून तर छत्तीसगड, मध्य प्रदेशच्या आणखी काही भागातून माघारी फिरला आहे. तर आसाम, मेघालय व वायव्य बंगालच्या काही भागातून नैऋत्य मौसमी वाऱ्याने माघार घेतलेली आहे. पूर्व मध्य आणि नगरच्या पश्चिम मध्य अरबी समुद्रावर असलेले ठळक कमी दाबाचे क्षेत्र याच भागावर स्थिर आहे. आज कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा व वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आज कोकणातील व विदर्भातील सर्व जिल्ह्यांना व मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांना व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तर आज सोमवारी कोकण गोव्यातील पालघर, ठाणे, मध्य महाराष्ट्रातील धुळे नाशिक येथे वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
पुणे आणि परिसरातील हवामानाचा अंदाज अशा प्रकारे आहे पुढील तीन ते चार दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाट सहित हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या