Maharashtra wether Update rain : राज्यात आज पूर्व भागात काही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच राज्यात बहुतांश भागात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे .
राज्यात आज विदर्भात व उद्या १५ तारखेला मध्य महाराष्ट्र व पूर्व भागात काही तुरळक ठिकाणी हलका ते अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या विविध भागात पुढील ५ दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर किमान व कमाल तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही. त्या पुढील दोन-तीन दिवसात दोन ते तीन डिग्री सेल्सिअसने तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या तिन्ही सागरी किनाऱ्यापासून काही अंतरावर समुद्रात सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उत्तर भारतात कडाक्याची थंडी तर दक्षिण भारतात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात पूर्व महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान राज्यात बऱ्याच भागात ढगाळ हवामान असल्याने याचा पिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
पुण्यात आज व उद्या आकाश मुख्यत: निरभ्र राहून दुपारी व संध्याकाळी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच सकाळी हलके धुके पडण्याची शक्यता आहे. त्यापुढील दोन दिवस आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
राज्यात बहुतांश जिल्ह्यात ढगाळ हवामान आहे. त्यामुळे फळबागा, रब्बी पिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रामुख्याने आंबा-काजूचा मोहर गळून पडत आहे. ढगाळ हवामानाचा प्रामुख्याने मका, हरभरा, दादर, उन्हाळी तीळ ज्वारी आदि पिकांवर परिणाम होणार आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज व उद्या अंशत: ढगाळ वातावरण राहणार आहे. तर किमान तापमानात फारसा बदल होणार नाही.
उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. राजधानी दिल्लीमध्ये कडाक्याची थंडी आहे. दाट धुक्यामुळे अनेक भागात दृश्यमानता खूपच कमी झाली आहे. मंगळवारपासून वायव्य भारताच्या काही भागात नव्याने निर्माण झालेल्या पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे राजधानीत या आठवड्यात आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाने (आयएमडी) बुधवारी आणि गुरुवारी दिल्लीत हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे, ज्यामुळे आकाश ढगाळ राहील आणि दिवसाचे तापमान २० अंश सेल्सिअसच्या खाली राहील.
संबंधित बातम्या