Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा पुनरागमन केले आहे. आज व पुढील काही दिवस राज्यात काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या महितीनुसार आज कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडणार आहे.
कोकणातील सिंधुदुर्ग, खानदेशातील जळगाव, मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, तर मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धारशिव तर विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज कोकण ते अरबी समुद्राच्या आग्नेय भागावर असलेली द्रोणीय क्षेत्र आता कर्नाटकातील कोमोरियन भागावर आहे. यमुळे विदर्भामध्ये पुढील पाच ते सहा दिवस तर कोकण गोवा मध्ये बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा सांगली व सोलापूर येथे पुढील चार ते पाच दिवस मेघ गर्जना विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्यापासून पुढील चार दिवस अहमदनगर, पुणे, नाशिक औरंगाबाद जालना येथे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जना वादळी वारा व वीजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भात पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे आणि आसपासच्या परिसरात पुढील दोन दिवस आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या एक व दोन सरी पडण्याची शक्यता आहे. पुण्यात जुलै महिन्यात पावसाने थैमान घातले होते. ऑगस्टमहिन्यात पुण्यात पावसाचा जोर ओसरला आहे. पुणे आणि घाट विभागात आज पासून पावसाचा जोर वाढणार असून हवामान विभागाने पवसाचा यलो अलर्ट दिला आहे.