Maharashtra Weather Update : राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाने ओढ दिली आहे. जुलै महिन्यात राज्यात सर्वदूर पाऊस होता. मात्र, ऑगस्ट महिन्यात पाऊस गायब झाला आहे. कोकणात व मध्य महाराष्ट्रात आज काही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट व पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, आज व उद्या कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस म्हणजे १४ ते १६ दरम्यान, कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज विदर्भाच्या चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यात १४ ऑगस्ट रोजी तर चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ येथे १५ व १६ ऑगस्टला पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघ गर्जना वीजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलेला आहे.
कोकणात पुढील पाच दिवस बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा तर मराठवाडा येथे तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील काही दिवस कोणताही अलर्ट देण्यात आला नाही.
पुणे व परिसरात आज व उद्या आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील तीन दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या पावसाच्या एक-दोन सरी पडण्याची शक्यता आहे. पुण्यातील घाट विभागात पावसाचा जोर कायम आहे. घाट विभागात व धरण परिसरात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने घाट परिसरात देखील यलो अलर्ट दिला आहे.