Maharashtra Weather Update : राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरूच आहे. आज देखील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा विदर्भ व मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने अहमदनगर, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा व यवतमाळ या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, वाऱ्याची खंडितता व परस्पर क्रिया आजही अंतर्गत तमिळनाडू ते मराठवाड्यापर्यंत जात आहे. त्यामुळे मराठवाडा विदर्भ व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वेळोवेळी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. आज विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या नंतर संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. अहमदनगर, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. कमाल व किमान तापमानात संपूर्ण राज्यांमध्ये फारसा बदल होणार नाही. परंतु उद्यापासून ४८ तासांत आकाश निरभ्र असल्यामुळे किमान तापमानात किरकोळ घट होण्याची शक्यता आहे.
पुणे व आजूबाजूच्या परिसरात आज वेळोवेळी आकाश अंशतः ढगाळ राहील उद्यापासून पुढील दोन-तीन दिवस आकाश निरभ्र राहील. ४ एप्रिल नंतर वेळोवेळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पुण्यात रविवारी कमाल तापमान ३८.४ तर कीमान तापमान २२.४ नोंदवल्या गेले. पुणे जिल्ह्यात शिरूरमध्ये सर्वाधिक ४२ डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे.
राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात रविवारी ४१ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यात थोडी घट झाली असली तरी, उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत.