Maharashtra Weather Update : राज्यात रखडलेल्या मॉन्सूनबाबत महत्वाची अपडेट हवामान विभागाने दिली आहे. राज्यात मॉन्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल वातावरण असून लवकरच संपूर्ण राज्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूढील तीन दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, कोल्हापूर, सातारा येथे आज तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पुढील तीन दिवस वादळी वारा, वीजांचा कडकडाट तसेच मेघगर्जना व ताशी ४० ते ५० किमी वेगाने वादळी वारे वाहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी पावसाची उत्तरी सीमा आज कायम आहे. नैऋत्य मोसमी पाऊस पुढील तीन ते चार दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी काही भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. एक उत्तर दक्षिण द्रोनिका रेषा ईशान्य अरबी समुद्र व लगतच्या सौराष्ट्र वरील चक्रीय स्थिती पासून ते पूर्व मध्य अरबी समुद्र व महाराष्ट्राच्या किनारपट्टी पर्यंत कायम आहे. आज कोकण गोव्यामध्ये बऱ्याच ठिकाणी व पुढील पाच-सहा दिवस बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील पाच ते सात दिवस काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात आज काही ठिकाणी तर पुढील चार-पाच दिवस तूरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात आज व उद्या बऱ्याच ठिकाणी व त्यानंतर पुढील तीन-चार दिवस काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण गोव्यात व मध्य महाराष्ट्रात पुढील चार-पाच दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात आज व विदर्भामध्ये पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाढण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भामध्ये आज काही ठिकाणी म्हणजे अमरावती व चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना आज यलो अलर्ट दिलेला आहे.
पुणे व परिसरात पुढील चार ते पाच दिवस आकाश ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी सामान्यतः ढगाळ राहील. तसेच एक-दोन हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे .
मुंबईत पावसाचा जोर कमी झाला आहे. काही तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईत ढगाळ हवामान असले तरी दमट वातावरणामुळे मुंबईकर घामाघूम झाले आहे.