Maharashtra weather update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यातून थंडी गायब झाली आहे. तर उकड्यात वाढ झाली आहे. असे असले तरी सकाळी थंडी दुपारी उन आणि रात्री थंड वारे असे हवामान राज्यातील नागरिक अनुभवत आहे. दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुडील काही दिवस पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात आणि मराठवाड्याच्या काही भागात २४ तारखेनंतर तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेत वाढ झाली आहे. जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ होऊ लागली आहे. पुणे, मुंबई, नागपूर, जळगाव, अकोला, वर्धा यासारख्या जिल्ह्यांत पारा हा ३५ डिग्री सेल्सिअसवर पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे अंगाची लाही होण्यास सुरुवात झाली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमि विक्षोभाचा प्रभाव अजूनही उत्तर भारतावर कायम आहे. अजून एक द्रोनिका रेषा हवेच्या विसंगतीच्या रूपात साउथ ईस्ट मध्य प्रदेश पासून तमिळनाडू पर्यंत जात आहे. त्यामुळे विदर्भ व तेलंगानात आद्रता पोहोचत आहे. परंतु हळूहळू ही आद्रता पुढील तीन ते चार दिवसात कमी होणार आहे. त्यामुळे ढगाळ वातावरणात घट होण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रात कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्र मध्ये पुढील पाच ते सात दिवस व मराठवाडा व विदर्भात पुढील तीन ते चार दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर २४ फेब्रुवारी नंतर मराठवाडा व विदर्भात अति हलक्या पावसाची शक्यता आहे. किमान तापमानात २१ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी पर्यंत साधारण तीन डिग्रीने घट होईल. तसेच याच काळात कमाल तापमानात सुद्धा किंचित घट होण्याची शक्यता आहे. २४ फेब्रुवारी नंतर पश्चिमेक्षक जसे पुढे येईल तसे किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
पुणे व परिसरात पुढील २४ तासात आकाश वेळोवेळी ढगाळ राहील. २२ फेब्रुवारी नंतर दोन ते तीन दिवस आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. २१ ते २४ फेब्रुवारीला किमान तापमानात साधारण तीन डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे त्याच काळात कमाल तापमानात सुद्धा किंचित घट होण्याची शक्यता आहे २५ फेब्रुवारी नंतर ढगाळ वातावरणात वेळोवेळी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २५ फेब्रुवारी नंतर किमान तापमानात सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे.
सध्या राज्यात सध्या सकाळच्या वेळेत थंडी जाणवते. मात्र, किमान तापमानात वाढ झाली असल्याने दुपारच्या वेळी प्रखर ऊन आणि उकाडा जाणवतो. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. त्यात पुढील दोन दिवस आत रविवारपासून विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.