Maharashtra Weather update : गेल्या ४८ तासांत राज्यातील हवामानात सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपातील पाऊस आणि गारपीठ अनुभवायला मिळत आहे, तर काही भागात लोक उकाड्याने हैराण झाले आहेत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या २४ तासात विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे, तर २१ मार्चपासून पुणे परिसरात कमाल आणि किमान तापमानात १-२ अंशानी वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. आज भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता वर्तवली असून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एक चक्रीय स्थिती पश्चिम विदर्भ व लगतच्या भागावर आहे. त्याचबरोबर वाऱ्याची खंडीतता ही द्रोणीय स्थिती स्वरूपात, दक्षिण कर्नाटक ते पश्चिम विदर्भातील चक्रीय स्थितीपर्यंत आहे. तसेच देशाच्या पूर्व भागात एक पश्चिमी विक्षोभ सक्रीय आहे. हवामानच्या या स्थितीचा परिणाम राज्यातील स्थानिक हवामानावर होत आहे. त्यानुसार विदर्भ परिसरात पुढील २४ तास मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपातील पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील इतर भागात मात्र हवामान प्रामुख्याने कोरडे राहील.
आज मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाड्यात वीजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा, आणि मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रमुख्याने नांदेड जिल्ह्यात मेघगर्जनेसह गारा पडण्याची शक्यता आहे. विदर्भात देखील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज प्रामुख्याने भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उद्या विदर्भ वगळता राज्यात इतर ठिकाणी हवामान कोरडे राहणार आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर २१ मार्च नंतर राज्यात हवामान कोरडे राहणार आहे.
पुणे आणि लगतच्या परिसरात पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार असल्याने. तर आकाश निरभ्र राहणार आहे. यामुळे पुढील आठवड्यात कमाल आणि किमान अशा दोन्ही तापमानात १-२ अंशांनी वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागातील शास्त्रज्ञांनी दिली आहे.
दरम्यान, राज्यात मंगळवारी, विदर्भात अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. या पासवामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. प्रामुख्याने भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यात पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले. पावसामुळे गहू, चणा, भात, तरकारी पिकांचे मोठे नुकसान झाले.