Maharashtra Weather Update: हवामान विभागाने विदर्भात पुढील चार दिवस गारांसह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून शेतकऱ्यांसह सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. राज्यातील तापमानात प्रचंड वाढ होत असताना अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस सुरु आहे. त्यातच आता विदर्भात अवकाळीसह वादळी वारे व गारपिटीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने विदर्भातील जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. नागपूर विभागात नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली तसेच पश्चिम विदर्भातील सर्व जिल्ह्यात अमरावती, अकोला, यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम येथेही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गारांसह पडणाऱ्या वादळी पावसामुळे पिके आणि फळपिकांच्या नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार नागपूर विभागात १६ मार्चपासून ते १९ मार्चपर्यंत वादळी वारे, गारपीट तसेच जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. १६ व १७ मार्च रोजी नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली या तीन जिल्हयात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
गारपीट आणि वादळी पावसामुळे मनुष्य तसेच वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. भारतीय हवामान विभागातर्फे नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर,चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयांत गुरुवार १६ मार्च तसेच शुक्रवार १७ मार्च रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यासोबतच १६ ते १९ मार्चपर्यंत संपूर्ण विदर्भात वादळी वारे तसेच गारांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे. भंडारा व गोंदिया जिल्हयात शुक्रवार १७ मार्च रोजी अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
संबंधित बातम्या