विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पुरतं पाणिपत झालं असून त्य़ांना ५० चा आकडाही गाठता आलेला नाही. महायुतीने नियोजनबद्ध पद्धतीने जोरदार प्रचार करून २३६ जागा मिळवल्या आहेत. या निकालानंतर काँग्रेसने काहीतरी गडबड असल्याचे तस उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र माझ्याशी असं वागेल असं वाटलं नव्हतं, असं म्हटलं होते. या निकालानंतर आता शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. शरद पवार आज (रविवार) सातारा दौऱ्यावर होते. यावेळीमहायुतीच्या खोट्या प्रचाराचा महाआघाडीला फटका बसल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केली.
शरद पवार म्हणाले, विधानसभेचा असा निकाल आम्हाला अपेक्षित नव्हता. पण शेवटी जनतेने दिलेला कौल आहे. असा अनुभव आम्हाला कधी आला नाही. मात्र याचा अभ्यास करावा लागणार आहे. आम्ही पुन्हा एकदा कामाला लागू. मी निकालाबाबत काही बोलू इच्छित नाही. या निकालानंतर आम्ही त्याची कारणमीमांसा करू. त्यानंतर पुन्हा नव्याने कामाला सुरुवात करू.
काल निकाल लागला आज मी कराडमध्ये आहे. हा निकाल लागल्यावर एखादा घरी बसला असता. पण मी घरी बसणार नाही. तरुण पिढीचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. त्यांना पुन्हा उभं करणं, त्यांचा आत्मविश्वास वाढवणं,नव्या जोमाने कर्तृत्वान पिढी उभं करणं हा माझा कार्यक्रम राहील. असा दुर्दम्य आशावाद त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या भूमिकेने आता राष्ट्रवादीत पुन्हा नवीन उत्साह संचारला आहे. राजकीय निवृत्तीवर बोलताना शरद पवार म्हणाले,मी निवृत्त व्हावं की नाही, हे मी आणि माझे सहकारी ठरवतील. दुसऱ्यांनी कशाला सांगायला पाहिजे.
शरद पवार म्हणाले की, बारामतीतून कोणी तरी उभं राहणं आवश्यक होतं. तिथं कुणालाही उभं केलं नसतं तर महाराष्ट्रात वेगळा मेसेज गेला असता. अजित पवार व युगेंद्र दोघांची तुलना होऊ शकत नाही, हे आम्हाला माहीत होतं. अजित पवार यांचं अनेक वर्षापासूनचं राजकारण,सत्तेतील सहभाग आणि दुसऱ्या बाजूला नवखा तरुण हे आम्हाला माहीत आहे, असे उत्तर त्यांनी युगेंद्र पवार आणि अजित पवार यांच्या लढतीवर दिले.
महायुतीच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, निवडणुकीत पैशाचा इतक्य़ा मोठ्या प्रमाणात वापर यापूर्वी पाहिला नव्हता. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून काही रक्कम महिलांना दिली गेली. महायुती सत्तेत नसली तर हे पैसे बंद होतील, असा खोटा प्रचार केला गेला, त्यामुळे कदाचित महिलांनी आपलं मत महायुतीला दिलं असेल. सत्ताधाऱ्यांच्या या प्रचाराचा आम्हाला फटका बसला. कटेंगे तो बटेंगे या नाऱ्याचाही राज्य़ात परिणाम झाल्याचं शरद पवार म्हणाले.