New MLA's Oath Taking Ceremony : महाराष्ट्र विधानसभेत निवडून आलेल्या आमदारांचा शपथविधी आज विधानसभेत पार पडला. वर्षानुवर्षे सभागृहात निवडून येणाऱ्या आमदारांसह काही जणांनी पहिल्यांदाच शपथ घेतली. त्यात भाजपचे नीतेश राणे व शिंदेंच्या शिवसेनेचे नीलेश राणे यांच्या शपथविधीनं सर्वांचं लक्ष वेधलं.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आझाद मैदानात पद व गोपनीयतेची शपथ घेतली. त्यानंतर आजपासून विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी सदस्यांच्या शपथविधीचा कार्यक्रम होता. हे सरकार लोकशाही मार्गानं निवडून आलेलं नसून ईव्हीएमच्या जोरावर आलं आहे असं म्हणत विरोधी पक्षाच्या आमदारांनी शपथविधीवर बहिष्कार घातला. त्यामुळं आज केवळ सत्ताधारी सदस्यांचा शपथविधी झाला.
कुणी संविधानाला, कुणी ईश्वराला तर कुणी अल्लाहला स्मरून शपथ घेतली. समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी हिंदीतून शपथ घेतली. माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांनी मराठीतून शपथ घेतली.
आक्रमकपणे हिंदुत्ववादी भूमिका मांडणारे आमदार नीतेश राणे यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली. शपथेच्या शेवटी त्यांनी जय श्रीराम… जय हिंद आणि जय महाराष्ट्र… अशा घोषणा दिल्या. तर, नीतेश राणे यांचे थोरले बंधू आमदार नीलेश राणे यांनी मराठीतून शपथ घेतली. शपथेच्या शेवटी त्यांनी 'जय नारायण' असं उल्लेख केला. हा उल्लेख त्यांचे वडील खासदार नारायण राणे यांना उल्लेखून होता की त्यातून काही वेगळं अभिप्रेत होतं हे समजू शकलेलं नाही.
नीलेश राणे हे कुडाळ मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे वैभव नाईक यांचा पराभव करून निवडून आले आहेत. नीलेश राणे हे यापूर्वी काँग्रेस पक्षातून लोकसभेवर देखील निवडून गेले होते. मात्र, नंतर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आता त्यांना विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. तर, नीतेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मतदारसंघातून तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आले आहेत.
संबंधित बातम्या