Maharashtra Assembly Election : मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी १९ ऑक्टोबर शेवटची संधी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Assembly Election : मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी १९ ऑक्टोबर शेवटची संधी

Maharashtra Assembly Election : मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी १९ ऑक्टोबर शेवटची संधी

Oct 18, 2024 11:44 PM IST

Maharashtra Vidhan Sabha Elections2024: विधानसभा निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावता यावा,यासाठी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे,यासाठी शनिवार १९ ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे.

मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी १९ ऑक्टोबर शेवटची संधी
मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी १९ ऑक्टोबर शेवटची संधी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील एकूण २८८ विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदान घेण्यात येणार असून २३ नोव्हेंबर रोजी निकाल आहे. या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे, ज्यांनी आपले नाव मतदार यादीत अद्याप समाविष्ट केलेले नाही त्यांना अजूनही शनिवारपर्यंत (१९ ऑक्टोबर २०२४) पर्यंत मतदार यादीत आपले नाव नोंदवण्याची संधी आहे.

ज्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट नाही, त्यांनी electoralsearch.eci.gov.in ह्या संकेत स्थळावर Voter Helpline ॲपवर मतदार यादीत आपले नाव तपासून घ्यावे.नाव नसेल तर त्वरीत मतदार नोंदणी करावी, तातडीने १९ ऑक्टोबरच्या आत आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, जेणेकरुन मतदानाच्या दिवशी मतदानाचा आपला हक्क मतदारांना बजावता येईल, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी केले.

अजूनही ज्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवलेले नाही त्यांना दि. १९ ऑक्टोबर रोजी रात्री पर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव नोंदणी करण्याची संधी उपलब्ध असून निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम अद्याप सुरु आहे. त्यामुळे ज्या पात्र नागरिकांची आतापर्यंत मतदार नोंदणी झालेली नाही,अशा नागरिकांकडून उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या १० दिवस अगोदरपर्यंत म्हणजेच १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत प्राप्त झालेले अर्ज ६ मतदार यादीमध्ये नोंद घेण्यासाठी विचारात घेण्यात येतील. तरी या संधीचा लाभ घेऊन सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करत मतदानाचा आपला हक्क आर्वजून बजावावा,तसेच सर्व मतदारांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट असल्याची खात्री तातडीने करुन घ्यावी,असे आवाहन चोक्कलिंगम यांनी केले आहे.

सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ४२० तक्रारी -

राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते १८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app)ॲपवर एकूण ४२० तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ४१४ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. यापैकी १०० मिनिटांत २५६ तक्रारींचा निपटारा करण्यात आल्या आहे. राज्यात ठाणे जिल्ह्यातील सर्वात जास्त तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.
 

विधानसभा निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण १०६४ लक्ष रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

 

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर