महाराष्ट्रविधानसभा निवडणूक २०२४ निकाल शनिवारी जाहीर झाले.अनेक एक्झिट पोल व राजकीय तज्ज्ञांचा अंदाज फोल ठरवून महायुतीने जोरदार मुसंडी मारत २३६ जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पार सुपडा साफ झाला असून त्यांना ५० चा आकडाही गाठता आलेला नाही. या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीसांची (devendra fadanvis) प्रतिमा उजळून निघाली आहे. त्यांच्या नेतृत्वात सलग तिसऱ्यांदा भाजपने शतकी मजल मारली.
विधानसभेत घवघवीत यश मिळाल्यानंतर महायुती लवकरच सत्ता स्थापनेचा दावा करु शकते. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना जनतेने मोठा कौल दिला आहे. यानंतर आता माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला पत्र लिहून आभार व्यक्त केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, महाराष्ट्र विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत महायुतीला मिळालेला महाविजय फक्त भाजपा-महायुतीचा नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाचा आहे. तुम्ही दाखवलेल्या या विश्वासासाठी आणि दिलेल्या प्रेमाबद्दल महाराष्ट्राच्या जनतेपुढे मी नतमस्तक होतो,असे ते आपल्या पत्रात म्हणाले.
मेहनत, एकजूटता, लाडक्या बहिणींचे आशीर्वाद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वावर महाराष्ट्राच्या तमाम जनतेने दाखविलेला विश्वास या विजयाचे खरे शिल्पकार असल्याचे फडणवीस आपल्यास पत्रात लिहितात. महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी, मित्रमंडळी आणि माझा प्रत्येक समर्पित कार्यकर्ता ज्यांनी गेले काही दिवस जिवाचे रान करून वेळ-काळ न पाहता मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, अशा आभार मानतो,असे फडणवीसांनी आपल्या पत्रात लिहिले आहे.
आपणा सर्वांच्या पाठिंब्यामुळेच महायुतीला मिळालेल्या या विजयाने एक नवीन दिशा दिली आहे. हे यश आपल्या महाराष्ट्राला एक प्रगतीशील आणि सर्वसमावेशक भवितव्यासोबत मा. मोदीजींच्या नेतृत्वात विकसित भारतासह विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रेरणा देत राहील, असे फडणवीस म्हणाले आहेत.
या निवडणुकीत भाजपने एकट्याने १३२ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे यावेळी भाजपाचा मुख्यमंत्री होणार का?या प्रश्नावरफडणवीसांनी म्हटले की, याबाबतीत अमित शहा यांनी स्पष्ट सांगितलं आहे की, मुख्यमंत्रीपद हे कोणत्याही निकषावर नाही,तर तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून ठरवतील. एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत,अजित पवार त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जो निर्णय घेतील तो मान्य असेल. याबाबत कोणताही वाद नाही. असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.