uddhav Thackeray criticized on Eknath shinde : राज्यात विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असून उमेदवार व नेत्यांचा सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या राज्यभर सभा सुरू आहेत. सोमवारी निवडणूक अधिकाऱ्यांनी वणी येथील सभेपूर्वी ठाकरे यांच्या बॅगांची हेलिपॅडवरच तपासणी केली. यावरून गजारोळ सुरू असतानाच आज दुसऱ्या दिवशीही औसा येथे ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. यामुळे ठाकरेंना ठरवून त्रास दिला जात असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आज जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका केली. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शाहांची देखील बॅग तपासावी, असे आव्हान केलं.
मला शिंदे फडणवीस यांच्या सांगण्यावरून चेकिंगवर टाकलं आहे असा आरोप उद्धव ठाकरे यांनी औसा येथील सभेत केला. माझी बॅग तुझ्याकडेच देतो, ती घेऊन येत जा. फक्त त्यातील कपडे चोरू नकोस, कारण चोर तो चोर असतो, असा टोला ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना लगावला. बॅग तपासायला हरकत नाही, माझं मन आणि बॅग दोन्हीही स्वच्छ असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंची मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी औसामध्ये बॅग तपासली गेली. उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरनं पोहोचण्याआधीच निवडणूक आयोगाचं पथक तेथं सज्ज होते. हेलिकॉप्टर लँड झाल्यावर लगेचच बॅगांची तपासणी सुरू झाली. उद्धव ठाकरेंनी त्याचा व्हिडिओ शूट केला आहे. मीच तुम्हा पहिला गिऱ्हाईक असतो का? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची देखील बॅगा तपासा, असं आव्हान उद्धव यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना दिलं. महाराष्ट्रातून जातानाही त्यांच्या बॅगा तपासा, कारण जाताना ते बरेच काही घेऊन जातात.
उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीनंतर संजय राऊतांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सत्ताधाऱ्यांच्या बॅगा का तपासल्या जात नाहीत असा सवालही संजय राऊत यांनी केला. गुजरातचे मंत्री प्रचारासाठी बॅगेतून फाफडा घेऊन येतात का, असा प्रश्न शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.