Raj Thackeray : शिवसेनेतील भांडखोर सासूमध्ये खरा प्रॉब्लेम; शिवडीतील सभेतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray : शिवसेनेतील भांडखोर सासूमध्ये खरा प्रॉब्लेम; शिवडीतील सभेतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Raj Thackeray : शिवसेनेतील भांडखोर सासूमध्ये खरा प्रॉब्लेम; शिवडीतील सभेतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Nov 18, 2024 04:28 PM IST

Raj Thackeray On Uddhav Thackeray : २०१९ पासून महाराष्ट्रात जे काही घडलं त्याला उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना भांडखोर सासूची उपमा देत ज्यांनी तुमच्या मतांचा अपमान केला त्यांना तुम्ही अद्दल घडवली पाहिजे, असं आवाहन मतदारांना केलं.

शिवडीतील सभेतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
शिवडीतील सभेतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

शिवडीतील आपल्या अखेरच्या सभेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर तुफान हल्ला चढवला. राज ठाकरे म्हणाले,  बाळासाहेब ठाकरेंनी स्वत: मशिदींवरी भोंगे उतरवा असं म्हटलं होतं. मी मशि‍दींवरील भोंगे उतरवले. भोंगे उतरवले नसते तर आम्ही हनुमान चालिसा लावणार होतो. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरेंच्या सरकारने आमच्या १७ हजार महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे दाखल केले. बाळासाहेबांनंतर ते राज ठाकरेंनी केलं. मग यामध्ये उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?, असा हल्लाबोल मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला.

शिवडी विधानसभा मतदारसंघाचे (shivdi assembly constituency) मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंनी आज दुपारी जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

२०१९ पासून महाराष्ट्रात जे काहीघडलं त्याला उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना भांडखोर सासूची उपमा देत ज्यांनी तुमच्या मतांचा अपमान केला त्यांना तुम्ही अद्दल घडवली पाहिजे, असं आवाहन मतदारांना केलं.

खरा प्रॉब्लेम शिवसेनेतील सासूमध्ये -

राज ठाकरे म्हणाले की, एका बाईला तीन मुलं असतात. पहिल्या मुलाचं लग्न होतं. त्यावेळी सासू आणि सुनेचं भांडण होतं आणि मुलगा ते घर सोडून जातो. सगळे बोलतात नवीन सून आल्यानंतर भांडण झाली. सून भांडखोर होती त्यामुळेच भांडून घर सोडून गेली. त्यानंतर दुसऱ्या मुलाचं लग्न होतं. दुसरी सून घरी येते. यावेळी दुसऱ्या सुनेचं देखील सासूसोबत भांडण होतं. तेही घर सोडून जातात. तिसरी सून येते, तो मुलगा देखील बायकोसोबत घर सोडून जातो. त्यानंतर लोकांना कळतं की तीन सुना होत्या, त्यांच्यात प्रॉब्लेम नव्हता, तर सासूमध्ये प्रॉब्लेम आहे. ती सासू म्हणजे उद्धव ठाकरे, असा अशी बोचरी टीका राज ठाकरेंनी केली.

 

सोडून गेलेले गद्दार नाहीत, तर खरा गद्दार उद्धव ठाकरे आहे. उद्धव ठाकरें मुळे सगळे शिवसेनेतून बाहेर पडले, उद्धव म्हणजे खाष्ट सासूसारखा, ज्याला सोडून सगळ्या सुना गेल्या. या माणसाच्या वागणुकीमुळे राणे बाहेर पडले. त्यांनंतर मी बाहेर पडलो आणि आता शिंदे, असं राज ठाकरेंनी सांगितले. शिवसेनेत जी सासू बसली आहे सर्व प्रॉब्लेम तिच्यात आहे. जी मुले सोडून गेली त्यांचा नाही. राज्यात २०१९ पासून जे घडले ते विसरू नका. या सगळ्याला कारण फक्त एक माणूस तो म्हणजे उद्धव ठाकरे, अशी टीका राज ठाकरेंनी केली.

Whats_app_banner