विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला असून अनेक पक्षांकडून उमेदवारांची घोषणा होत आहे. भाजपने रविवारी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता यंदा उदयास आलेल्या तिसऱ्या आघाडीकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील परिवर्तन आघाडीने आपल्या ८ उमेदवारांची नावे जाहीर केली असून स्वाभिमानीच्या २ उमेदवारांची नावे उद्या (२२ ऑक्टोबर) रोजी जाहीर केली जाणार आहेत. परिवर्तन महाशक्तीकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत आमदार बच्चू कडू यांचे नाव असून ते अचलपूर मतदारसंघातून प्रहारच्या चिन्हावर लढणार आहेत.
राज्यात महाविकास आघाडी व महायुतीमधील जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून या आघाडीतील घटक पक्षांकडून लवकरच यादी जाहीर केली जाणार आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने निवडणूक जाहीर होण्याच्या आधीच उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. वंचितने आतापर्यंत ६६ उमेदवारांची घोषणा केली आहे. आता तिसऱ्या आघाडीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडी व महायुतीला पर्याय म्हणून तिसऱ्या आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार बच्चू कडू यांनी एकत्र येत परिवर्तन महाशक्तीची स्थापना केली आहे. तिसरी आघाडी राज्यात २८८ जागा लढवणार असून आज पहिली यादी जाहीर केली आहे. अचलपूर, रावेर, ऐरोली, चांदवड, देगलूर, हिंगोली या जागांवर तिसऱ्या आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. या यादीत शिरोळ आणि मिरज या जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्यात आल्या आहेत. पण या यादीत उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेली नाही. राजू शेट्टी आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन नावांची घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे.
बच्चू कडू आपल्या परंपरागत अचलपूर विधानसभा मतदारसंघातून लढणार आहेत. त्यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे अन्य तीन उमेदवारांचा पहिल्या यादीत समावेश करण्यात आला आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने दोन उमेदवारांना पहिल्या यादीत स्थान दिले आहे. तसेच शिरोळ आणि मिरज या दोन मतदारसंघात स्वाभिमानी पक्ष उद्या उमेदवार जाहीर करणार आहेत.