Maharashtra vidhan sabha election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकांना रंगत आली आहे. प्रचारासाठी अवघे काही दिवस उरले असून उमेदवार व कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. आपल्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी दिग्गज नेते मैदानात उतरले आहे. आज मंगळवारी राज्यात प्रचार टिपेला पोहोचणार आहे. आज राज्यात पंतप्रधान मोदी यांच्या दोन सभा तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या दोन सभा होणार आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या देखील दोन सभा मुंबईत होणार आहे. त्यामुळे आज एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज राज्यात तीन जाहीर सभा होणार आहेत. मोदी यांची पुण्यातील एस.पी महाविद्यालयांच्या मैदानवर सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. गेल्यावेळी पावसामुळे मोदी यांच्या सभेत विघ्न आणले होते. मात्र, यावेळी भाजपने या सभेची जय्यत तयारी केली आहे. महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार आज मोदी पुण्यात करणार आहेत. पुण्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज चिमूर, सोलापूर येथे देखील जाहीर सभा होणार आहेत.
आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देखील राज्याच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी यांच्या चिखली (जि. बुलडाणा) आणि गोंदिया येथे सभा होणार आहेत. राहुल गांधी आज हे येथून विरोधकांवर तोफ डागणार आहेत. राज्यात त्यांच्या झांजावाती प्रचार दौऱ्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या देखील सभा राज्यात होणार आहेत. गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबईत दोन सभा होणार आहेत तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा अकोला, अमरावती व नागपुरात आयोजित करण्यात आल्या आहेत.
राज्यातील प्रचारासाठी आता अवघे काही दिवस उरले आले. १७ तारखे पर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. १८ तारखेला प्रचाराच्या तोफा या थंडावणार आहेत. त्यामुळे कमी दिवसांत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन उमेदवारांपुढे आहे. २० तारखेला मतदान तर २३ तारखेला मतमोजणी राहणार आहे. त्यामुळे शरद पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, अजित पवार, नाना पटोले, अॅड. प्रकाश आंबेडकर, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आदि नेते हे प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.