अखेर ठरलं! महाविकास आघाडीकडून ८५-८५-८५ फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; शिल्लक जागांचं गणित कसं असणार?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अखेर ठरलं! महाविकास आघाडीकडून ८५-८५-८५ फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; शिल्लक जागांचं गणित कसं असणार?

अखेर ठरलं! महाविकास आघाडीकडून ८५-८५-८५ फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; शिल्लक जागांचं गणित कसं असणार?

Updated Oct 23, 2024 08:11 PM IST

MVA Seat Sharing Formula : महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर जाहीर करण्यात आला आहे. ८५-८५-८५ असा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला असून ठाकरे गटाकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी देखील जाहीर करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीकडून जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर
महाविकास आघाडीकडून जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर

MVA Seat Sharing Formula : महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत वाद सुरू असल्याच्या चर्चा होत होत्या. मात्र महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा आता सुटण्याच्या मार्गावर असून आज तिन्ही प्रमुख पक्षांचे ८५-८५-८५ अशा नव्या फॉर्म्युल्यावर एकमत झाले आहे. उर्वरित ३३ जागांवर उद्या (गुरुवार) अन्य लहान मित्रपक्षांसोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर झाल्याने सस्पेन्स संपला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज वाय. बी. चव्हाण सेंटर येथील बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला.

विदर्भातील व मुंबईतील काही जागांवरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात मोठा वाद झाला होता. मात्र याबाबत दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी बैठक घेत वाद मिटवण्याची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवली होती. त्यानंतर महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवण्यात आला.

संजय राऊत म्हणाले की, आम्ही तूर्तास ८५-८५-८५ असा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. आमच्या अन्य मित्रपक्षांना १८ जागा देण्यात येतील आणि उर्वरित जागांबाबत उद्या पुन्हा चर्चा करून निर्णय घेतला जाईल. प्रत्येक पक्ष आपली भूमिका घेऊन जात असतो. आम्ही महाविकास आघाडीत एक आहोत आणि चर्चा सुरू आहे. आमच्या जागावाटपावरून वाद झाल्याच्या बातम्यांनी ज्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या त्यांना सांगा की सगळं सुरळीत झालं आहे, असा टोला राऊत यांनी महायुतीला लगावला.

काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले की, शरद पवार यांच्या नेतृत्वात तिन्ही पक्षाची बैठक पार पडली. त्यात ५-८५-८५ म्हणजे जागांवर एकमत झालं आहे. १८ जागा आमच्या मित्र पक्षाला देणार आहोत. त्यामध्ये शेकाप व समाजवादी पार्टी आदिसह अन्य पक्ष आहेत.

दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली असली तरी महाविकास आघाडीकडून जागावाटप जाहीर न झाल्याने इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्येही गोंधळाची स्थिती होती. मात्र महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी ८५-८५-८५ असा २५५ जागांचे वाटप निश्चित करत तात्पुरता तोडगा काढला असून उर्वरित ३३ जागांवर काय निर्णय होतो, हे पाहणं उत्सुकतेचे आहे.

Whats_app_banner