वणी हेलिपॅडवर उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरची झडती; ठाकरे म्हणाले, बॅगाच काय, युरिन पॉट देखील तपासा, पाहा VIDEO
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  वणी हेलिपॅडवर उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरची झडती; ठाकरे म्हणाले, बॅगाच काय, युरिन पॉट देखील तपासा, पाहा VIDEO

वणी हेलिपॅडवर उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरची झडती; ठाकरे म्हणाले, बॅगाच काय, युरिन पॉट देखील तपासा, पाहा VIDEO

Nov 11, 2024 06:39 PM IST

Uddhav Thackeray : वणीच्या हेलीपॅडवर उतरताच उद्धव ठाकरे व त्यांचे सहकारी मिलिंद नार्वेकर यांच्या बॅगा तपासण्यात आल्या आहेत. ज्या बॅग तपासण्यावरून गदारोळ सुरू असून याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

वणी हेलिपॅडवर उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरची झडती
वणी हेलिपॅडवर उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरची झडती

माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात प्रचारसभांचा धडाका लावला आहे. उद्धव ठाकरे यांची आज वणी येथे सभा होत आहे. या सभेसाठी ठाकरे हेलिकॉप्टरने गेले आहेत, वणी हेलिपॅडवर उतरताच ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांची बॅग निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासल्याचे समोर आले आहे. दरम्यान, यानंतर उद्धव ठाकरे संतापल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला.

वणीच्या हेलीपॅडवर उतरताच उद्धव ठाकरे व त्यांचे सहकारी मिलिंद नार्वेकर यांच्या बॅगा तपासण्यात आल्या आहेत. ज्या बॅग तपासण्यावरून गदारोळ सुरू असून याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओमधून निवडणूक अधिकारी उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासताना दिसून येत आहेत. यावेळी ठाकरेंनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केल्याचे दिसून येत आहे.

शिवसेना यूबीटीने याचा व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे की,  डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानात सगळ्यांना समान न्याय हे आम्ही मानतोच.पण यंत्रणांना हाताशी धरुन लोकशाहीला पायदळी तुडवून हुकुमत गाजविणाऱ्या दिल्लीश्वरांनी मात्र त्या संविधानाचा सगळ्याच पातळ्यांवर अवमान करायचा ठरवलं आहे.

आज उद्धवसाहेबांच्या सामानाची वणी येथे काही अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. झालं ते उत्तमच झालं! कर नाही त्याला डर कशाला? पण आता अशीच तपासणी कमळाबाईच्या आणि गद्दारांच्या सामानाची पण व्हायलाच हवी! जनतेला समजायला हवं, खोके कोण, कुठून आणि कसं नेतंय आणि चोर सोडून सन्यास्याला फाशी देण्याचा प्रयत्न कोण करतंय!

व्हिडिओमध्ये अधिकारी ठाकरेंच्या बॅग तपासताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांचा आवाज व्हिडिओमध्ये येत आहेत. अधिकाऱ्यांशी बोलताना ठाकरे म्हणतात की, तुम्ही आत्तापर्यंत कोणाची बॅग तपासली आहे का, मीच पहिला आहे. कधी शिंदेंची बॅग तपासली का? देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचं समान तपासलं का? मीच पहिला आहे का? मोदी - शहा आले तर त्यांच्या बॅग तपासण्याचा व्हिडिओ मला बनवून पाठवा. मला तुमची नावं सांगा,माझं नाव उद्धव ठाकरे आहे, तुमची नावसुद्धा सांगा. महाराष्ट्रातल्या तपासण्या करायला सुद्धा आता बाहेरच्या राज्याची माणसं आणली जातात, असं म्हणत उपहासात्मक टोला त्यांनी यावेळी लगावला.

महाविकास आघाडीचे वणी विधानसभेचे अधिकृत उमेदवार संजय देरकर ह्यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत सत्ताधारी महायुतीसह केंद्र शासनावरही उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली. याच सभेत निवडणूक अधिकाऱ्यांनी बॅगा तपासल्याचा प्रसंग सांगत उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.

पाहा व्हिडिओ -

यानंतरसभेत बोलताना उद्धव ठाकरेयांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले की, मी हेलिकॉप्टरने आलो तेव्हा आठ, दहा जण माझ्या स्वागतासाठी आले होते. म्हटलं काय करायचं आहे. ते म्हणाले, बॅग तपासायची आहे, मी म्हणालो तपासा. त्यांचा व्हिडीओ काढला आहे. एक लक्षात घ्या तुम्हाला कुठेही चौकशीसाठी किंवा तपासणीसाठी अडवले तर त्यांचीही चौकशी करा. ते कुठे नोकरीला आहेत हे तपासा. जसे ते आपले खिसे तपासतात तसे त्यांचेही तुम्ही खिसे तपासा कारण हा आपला अधिकार आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Whats_app_banner