Tasgaon Kavathe Mahankal Assembly constituency :विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीतून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात नवे समीकरण समोर आले आहे. भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत हातात घड्याळ बांधले आहे. तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभेच्या रिंगणात स्वत: संजयकाका उतरणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर.आर.पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्याविरोधात संजय पाटील यांनी शड्डू ठोकला आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून जागावाटपाचा पेच सोडवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. जागांचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीमधील घटक पक्षांमध्येच पक्षांतर केले जात आहे. राज्याच्या राजकारणातील अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीपैकी एक असलेल्या तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभेत आता तुल्यबळ लढत होणार आहे. संजय काका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील विरुद्ध रोहित पाटील लढत होण्याची शक्यता असतानाच आता स्वत: संजय काका पाटील रोहित पाटलांशी दोन हात करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आर.आर पाटलांपासून दोन्ही पाटील घराण्यांमधील ही लढत राजकीय वर्तुळात बरीच चर्चेत राहिली आहे.
२९ ऑक्टोबर रोजी संजय पाटील विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार असून यावेळी अजित पवार उपस्थित राहणार आहेत. संजय पाटील व आर आर पाटील यांच्यातील लढत राज्यात लक्षवेधी ठरत होती. मागील अनेक वर्षांपासून या मतदारसंघातील वाद हे कायमच पटलावर राहिले आहेत.
सांगली लोकसभा मतदारसंघातून संजय पाटील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र अपक्ष उमेदवार विशाल पाटलांनी विजय मिळवत संजय पाटलांना पराभूत केलं होतं, आता त्यांनी विधानसभेसाठी कंबर कसली आहे. कवठेमहांकाळ मधील माजी आमदार अजित घोरपडे अजित पवार गटासोबतच आहेत. त्यामुळे अजितराव घोरपडे यांनी महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केलाय. यामुळे या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
मागच्यावेळी आमदार सुमनताई पाटील यांच्याविरोधात अजितराव घोरपडे यांनी निवडणूक लढवली होती. यावेळी पक्षफुटीमुळे निवडणुकीतील समिकरणे बदलली आहेत. यावेळी शरद पवार यांनी रोहित पाटील यांची उमेदवारी राज्यात पहिल्यांदा जाहीर केली आहे. तासगाव-कवठेमहांकाळ हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्याने रोहित पाटलांविरोधात अजित पवारांनी संजय पाटलांना उतरवले आहे.
संबंधित बातम्या