Maharashtra Legislative Council Election 2024: राज्यातील विधानसभा निवडणुका अवघ्या काहीच महिन्यांवर येऊन ठेपल्या असतांना या निवडणुकी पूर्वीची उपांत्य फेरी आज होणार आहे. आज विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान होणार असून या साठी १२ उमेदवार रिंगणात असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. आज एक उमेदवार पराभूत होणार असून कोणता अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, आमदार फुटू नये यासाठी महायुतीने विशेष काळजी घेतली आहे. सर्व आमदारांना पाच पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. लोकसभेतील आपल्या कामगिरीने सत्ताधारी पक्षांना चकित करणाऱ्या महाविकास आघाडीने आपले तीन उमेदवार उभे केले आहेत.
२८८ जागांच्या महाराष्ट्र विधानसभेत सध्या २७४ आमदार आहेत. विधान परिषद निवडणूक जिंकण्यासाठी कोणत्याही पक्षाला २३ प्रथम प्राधान्य मतांची आवश्यकता आहे. या निवडणुकीत महायुतीने ९ उमेदवार रिंगणात उभे केले आहेत. तर महाविकास आघाडीकडे केवळ ६७ आमदारांचा पाठिंबा आहे. असे असतानाही त्यांनी ३ उमेदवार उभे केले आहेत. अशा स्थितीत आमदार फुटण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात पुढील काही महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका घोषित होणार आहेत. त्यामुळे ही या निवडणुकांची उपांत्य फेरी आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची कामगिरी अत्यंत खराब होती. अजित पवार गटातील काही आमदार हे शरद पवार गटात पुन्हा परतण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंगची शक्यता आहे. यामुळे महायुती कोणतीही रिस्क घेण्यास तयार नाहीत.
शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देऊन विधान परिषद निवडणुकीतील चुरस वाढवली आहे. जर विजयाचा विश्वास नसता तर आम्ही हे पाऊल उचलले नसते असे ठाकरे ठाकरे यांनी म्हटले आहे.
भाजपचे १०३ आमदार आहेत. विधान परिषदेसाठी त्यांनी ५ उमेदवार उभे केले आहेत. भाजपकडून पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडे विजयासाठी आवश्यक असलेल्या संख्येपेक्षा १२ आमदार कमी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे विधानसभेत ३७ आमदार आहेत. त्यांनी दोन उमेदवार उभे केले आहेत. कृपाल तुमाने आणि भावना गवळी अशी त्यांच्या उमेदवारांची नावे असून त्यांच्याकडे नऊ आमदार कमी आहेत.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे ३९ आमदार आहेत. कनिष्ठ पवार यांनी राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे हे उमेदवार उभे केले आहेत. त्यांना सात आमदारांचा पाठिंबा नाही. मात्र, सत्ताधारी आघाडीला छोट्या पक्षांचे नऊ आमदार आणि १३ अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे.
महाविकास आघाडीतील कॉँग्रेसकडे ३७ आमदार आहे. त्यांनी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहिर केली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या १३ आमदारांसह शेतकरी आणि मजदूर पक्षाचे (पीडब्ल्यूपी) जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याकडे केवळ १५ आमदार आहेत, जे आवश्यक संख्येपेक्षा आठने कमी आहेत.
पाटील आणि नार्वेकर यांच्यासाठी काँग्रेसच्या मतांची कमतरता भरून काढू शकते, परंतु दोन AIMIM आमदार, दोन सपा आमदार, एकमेव CPI(M) आमदार आणि एक अपक्ष आमदार तटस्थ राहू शकतात. त्यांची मते महत्त्वाची ठरणार आहेत. यापैकी किमान काही आमदारांचा महाविकास आघाडीला पाठिंबा असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी रात्री मुंबईतील एका हॉटेलमध्ये आपल्या पक्षाच्या आमदारांसाठी जेवण ठेवले होते. काँग्रेसने आपल्या आमदारांना व्हीप जारी करून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्यास सांगितले आहे.
उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री मध्य मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आपल्या आमदारांसोबत डिनरचे आयोजन केले होते. पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, बैठकीला उपस्थित असलेले सर्व ११ आमदार हॉटेलमध्ये थांबले होते. गुरुवारी त्यांच्यासोबत उर्वरित चार आमदारही सामील झाले.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आपल्या आमदारांना मुंबईतील विमानतळाजवळील पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवले आहे. शिवसेनेचे आमदार बुधवारी सकाळी विधानभवन संकुलात बैठकीसाठी जमले आणि त्यानंतर ते वांद्रे येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये गेले. भाजपचे आमदारही आलिशान हॉटेलमध्ये आहेत, मात्र राष्ट्रवादीने (शरदचंद्र पवार) असे कोणतेही पाऊल उचललेले नाही.