Vidhan Parishad Result: महाविकास आघाडीला खिंडार.. २१ मते फुटली? काँग्रेसला धक्का
महाविकास आघाडीची एकूण २१ मतं फुटल्याची माहिती समोर येत आहे. कुणाची किती मतं फुटली याबाबत अद्याप माहिती समोर आली आहे.
मुंबई - विधान परिषद निवडणुकीचा निकाल हाती आला असून भारतीय जनता पार्टीचे चार उमेदवार निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन उमेदवार विजयी झाले आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना पहिल्या पसंतीची २६ मतं मिळाली असून त्यांचा निकाल अद्याप बाकी आहे. भाजपाचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात अद्याप चुरस सुरू आहे.
ट्रेंडिंग न्यूज
प्राथमिक माहितीनुसार, महाविकास आघाडीची एकूण २१ मतं फुटल्याची माहिती समोर येत आहे. कुणाची किती मतं फुटली याबाबत अद्याप माहिती समोर आली आहे.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार विधान परिषदचे विजयी उमेदवार…
राष्ट्रवादी काँग्रेस -रामराजे नाईक निंबाळकर (२९ मते ), एकनाथ खडसे (२८ मते)
शिवसेना – सचिन अहिर (२६ मते), आमशा पाडवी (२६ मते)
भारतीय जनता पार्टी- प्रवीण दरेकर (२९ मते), श्रीकांत भारतीय (३० मते), राम शिंदे (३० मते), उमा खापरे (२७ मते), प्रसाद लाड (निकाल बाकी)
काँग्रेस -चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप (अद्याप निकाल अस्पष्ट)
महाविकास आघाडीला खिंडार
भाजपच्या उमेदवारांना १३३ मते मिळाल्याची माहिती भाजप नेते अतुल भातखळकर यांनी दिली. प्रवीण दरेकर यांना २९, श्रीकांत भारतीय, राम शिंदे यांना प्रत्येकी ३० तर उमा खापरे यांना २८ मते मिळाली असून, प्रसाद लाड यांना पहिल्या पसंतीची १७ मते मिळाल्याचे भातखळकर यांनी सांगितले.
महाविकास आघाडीला पुन्हा एकदा विधान परिषद निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महाविकास आघाडीची पहिल्या पसंतीची २१ मते फुटल्याचे सांगितले जात आहे.
विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत २ मते बाद झाल्यानंतर २८३ मते वैध ठरवण्यात आली. त्यानंतर पहिल्या पसंतीच्या फेरीत भाजपचे ४, शिवसेनेचे २, राष्ट्रवादीचे २ उमेदवार निवडून आले. त्यानंतर या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. या निवडणुकीत भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांना पहिल्या पसंतीची १७ मते मिळाली तर भाई जगताप यांना पहिल्या पसंतीची २० मते मिळाली.