Maharashtra Assembly Elections : राज्यात या वर्षी मतदानाचा टक्का वाढला आहे. राज्यात एकूण ६६.५ टक्के मतदान झाले असून गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदान ५ टक्यांनी वाढले आहे. मुंबई शहरात ५२.६५ टक्के तर मुंबई उपनगरात ५६.३९ टक्के मतदान झाले आहे. तर सर्वात कमी मतदान हे मुंबई शहरातील कुलाबा येथे ४४.४४ एवढे झाले आहे. तर सर्वाधिक मतदान हे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर येथे झाले आहे. या ठिकाणी तब्बल ८४.९६ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, वाढलेले मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार हे उद्या मतमोजणी नंतर स्पष्ट होणार आहे. भरघोस मतदान झाल्याने सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विजयाचा दावा केला आहे.
राज्यात गेल्या काही निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का कमी झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील हा ट्रेंड कायम राहणार का ? या कडे लक्ष होते. दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्याचं दिसून आलं आहे. निवडणूक आयोगाने मतदान वाढीसाठी केलेले व्यापक प्रयत्न तसेच सत्ताधारी आघाडी व सत्तासमर्थक या सोबतच निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आलेली लाडकी बहिण योजना आणि इतर कल्याणकारी योजना देखील मतदान वाढीसाठी कारणीभूत ठरले असल्याचे मत तज्ञांनी वर्तवले आहे.
निवडणूक आयोगाने गुरुवारी जाहीर केले की, राज्यात एकूण मतदान ६६.०५ टक्के झाले आहे. १९९५ नंतर झालेले हे सर्वाधिक मतदान झाले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ६१.४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ६१.३९ टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत सुमारे ५ टक्के मतदानाची वाढ झाली आहे. २०१९ मध्ये ८.८५ कोटी नोंदणीकृत मतदारांच्या तुलनेत नोंदणीकृत मतदारांची संख्या यंदा ९.५ टक्क्यांनी वाढून ९.६९ कोटी झाली आहे. त्यामुळे शनिवारी जाहीर होणाऱ्या निकालांमध्ये वाढलेल्या मतांच्या आधारावर जास्त मतदान होणे हा महत्त्वाचा घटक ठरणार आहे. १९९९ नंतर झालेल्या गेल्या सहा निवडणुकांमधील बुधवारी सर्वाधिक मतदान झाले. त्याआधी १९९५ मध्ये ७१.६९ टक्के मतदान झालं होतं.
राज्यात या वर्षी मतदानाचा टक्का वाढला आहे. राज्यात एकूण ६६.५ टक्के मतदान झाले आहे. मुंबई शहरात ५२.६५ टक्के मतदान झाले. तर मुंबई उपनगरात ५६.३९ टक्के मतदान झाले आहे. तर सर्वात कमी मतदान हे मुंबई शहरातील कुलाबा येथे ४४.४४ एवढे झाले आहे. सर्वाधिक मतदान हे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर येथे झाले आहे. या ठिकाणी तब्बल ८४.९६ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली आहे. अनेक मतदारसंघांत महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा किंचित असली तरी महिलांनी सर्वाधिक मतदान केलं आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगावमध्ये ७२.३९ टक्के पुरुषांच्या तुलनेत ७२.४६ टक्के महिलांनी मतदान केले. गुहागर, रत्नागिरीत ६१.११ टक्के पुरुषांच्या तुलनेत ६२.४ टक्के महिलांनी मतदान केले. तर पनवेल, रायगडमध्ये देखील स्त्रियांनी पुरुषांच्या तुलनेत सर्वाधिक मतदान केलं. गेल्या निवडणुकीत हा आकडा ५८.२१ टक्के होता. तो यंदाच्या निवडणुकीत वाढून ५९.१३ टक्के इतके झाला.
राज्यातील वाढलेले मतदान कुणाला फायदेशीर ठरणार हे उद्या २३ तारखेला स्पष्ट होणार आहे. राज्यातील निवडणुकीचे चित्र ९ वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्यांनी आपले सरकार येईल असा दावा केला आहे. त्यानुसार बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.