राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षक भरती प्रक्रियेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. येत्या २९ जानेवारीपासून पवित्र पोर्टलवर जाहिराती पाहता येणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसह खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकभरती आता ‘पवित्र’ पोर्टलच्या माध्यमातून होणार आहे
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या शाळांसह खासगी अनुदानित शाळांमध्ये सद्य:स्थितीत ६४ हजार शिक्षकांची कमतरता आहे. मात्र, शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांची भरती होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीनुसार आणि ‘टेट’ व ‘सीएआयटी’ चाचणीतील गुणांवरून होईल. यासाठी इच्छुक उमेदवारांना पवित्र पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे.
प्राथमिक व माध्यमिक शाळांचे विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील पवित्र पोर्टलवरील प्रलंबित जाहिराती पूर्ण कराव्यात. त्यानंतर तपासणी करून संबंधित व्यवस्थापनाने ७ फेब्रुवारीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार आपल्या कार्यक्षेत्रातील वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात आले.
पात्र उमेदवार २९ जानेवारीपर्यंत पोर्टलवर प्रकाशित सर्व जाहिराती पाहू शकतील. पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींमध्ये पात्र उमेदवारांना लवकरात लवकर प्राधान्य दिले जाईल. यासंदर्भातील सूचना स्वतंत्रपणे प्रसिद्ध केल्या जातील, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.