Supriya Sule: माजी आयपीएस विरोधात सुप्रिया सुळे यांची निवडणूक आयोगाकडे धाव, नेमके प्रकरण काय?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Supriya Sule: माजी आयपीएस विरोधात सुप्रिया सुळे यांची निवडणूक आयोगाकडे धाव, नेमके प्रकरण काय?

Supriya Sule: माजी आयपीएस विरोधात सुप्रिया सुळे यांची निवडणूक आयोगाकडे धाव, नेमके प्रकरण काय?

Nov 20, 2024 12:18 AM IST

Supriya Sule approaches ECI: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माजी आयपीएस विरोधात यांची निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.

Mumbai: NCP (SP) leader Supriya Sule addresses a press conference.
Mumbai: NCP (SP) leader Supriya Sule addresses a press conference. (PTI)

Supriya Sule News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील आणि गौरव मेहता यांच्या विरोधात निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे. सुप्रिया सुळे आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांनी २०१८ मध्ये बिटकॉइन गैरव्यवहार केला आणि तो पैसा यंदाच्या निवडणुकीत वापरत असल्याचा आयपीएस अधिकाऱ्यांनी आरोप केला. दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या विरोधात खोटी माहिती पसरवणाऱ्या पुण्याचे माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील आणि गौरव मेहता यांच्या विरोधात सायबर फसवणुकीची तक्रार तात्काळ दाखल करण्यात यावी, अशी मागणी त्यांच्या वकीलांनी केली.

निवडणूक आयोगाला असे लिहिण्यात आले आहे की, 'माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील आणि गौरव मेहता यांनी सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्यावर बिटकॉईनमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप केला. एवढेच नव्हेतर, त्यांनी या आरोपांना बळ देण्यासाठी सुप्रिया सुळेंच्या आवाजाची खोटी ऑडिओ क्लिप तयार करण्याचाही प्रयत्न केला. डिजिटल माध्यमांचा वापर करून एखाद्या व्यक्तीची फसवणूक आणि बदनामी करण्याच्या हेतूने केलेला हा गंभीर गुन्हा आहे. हे आरोप केवळ खोटे नाहीत तर, सुप्रिया सुळे यांची प्रतिमा आणि प्रतिष्ठा मलिन करण्याचा दुर्भावनापूर्ण प्रयत्न आहे.'

पुढे पत्रात असे लिहिण्यात आले आहे की, 'राज्यात उद्या (बुधवारी) विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मतदानाच्या एक दिवस आधी असे आरोप केले जात आहेत. यावरून या खोट्या आरोपांमागील हेतू सिद्ध होतो. कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार त्वरित एफआयआर नोंदवावा आणि अशा व्यक्तींविरुद्ध सखोल चौकशी करावी, अशी आमची मागणी आहे.'

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी सर्व २८८ जागांसाठी मतमोजणी होणार आहे. राज्यात महाविकास आघाडी (काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गट) आणि महायुती (भाजप, शिंदे गट, अजित पवार गट) यांच्यात मुख्य लढत आहे. २०२९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५, शिवसेनेला ५६ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या. तर, २०१४ मध्ये भाजपला १२२ जागा, शिवसेनेला ६३ आणि काँग्रेसला ४२ जागा मिळाल्या होत्या. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत जनता कोणाच्या बाजुने कौल देणार, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.

 

 

 

 

 

 

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर