MSRTC News: राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांनाही वेतन मिळावे, अशा विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटनेने आजपासून बेमुदत संपाची हाक दिली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपामुळे राज्यभरातील बससेवा विस्कळीत झाली. सकाळी ८.०० वाजेपर्यंत राज्यातील एकूण ३५ डेपो पूर्णपणे बंद करण्यात आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. मुंबईच्या रस्त्यांवर या संपाचा परिणाम दिसत नसला तरी मुंबई महानगर प्रदेश आणि महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये या संपाचे पडसाद उमटत आहेत.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सोलापूर विभागातील वाहतूक सेवा सुरळीत सुरू आहेत. तर, ठाणे, कल्याण, विठ्ठलवाडी डेपो पूर्णपणे बंद आहेत. संपाचा परिणाम मराठवाड्यातही जाणवत असून, लातूर आणि नांदेड विभागातील बहुतांश डेपो बंद आहेत. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी एमएसआरटीसी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसह इतर प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या मागणीसाठी हा संप पुकारला. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे, अशी संघटनेची मागणी आहे.
पुण्यातील शिवाजीनगर, वल्लभनगर, भोर, सासवड, बारामती आणि तळेगाव बस डेपो पूर्णपणे बंद आहेत. सांगलीत मिरज, जत आणि पलूस डेपोच्या सेवेवर परिणाम झाला आहे. याशिवाय, साऱ्यातील कराड, वडूज आणि महाबळेश्वर डेपो जळगावातील भुसावळ आणि चाळीसगाव डेपो नाशिक येथील पिंपळगाव आणि पेठ डेपो पूर्णपणे बंद झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सुमारे १५ हजार बस चालवल्या जातात. या बसमधून दररोज ५.५ दशलक्ष लोक प्रवास करतात. संपामुळे मोठ्या संख्येने दैनंदिन प्रवाशांची गैरसोय झाली आहे, जे त्यांच्या वाहतूक गरजांसाठी या सेवांवर अवलंबून आहेत. संपाची स्थिती जाणून घेतल्यानंतर प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
विठ्ठलवाडी बस आगारात गावाकडे जाण्यासाठी प्रवाशांची तोबा गर्दी दिसत आहे. एसटीच्या संपामुळे लांब पल्याच्या अनेक गाड्या ठप्प झाल्या आहेत. मागण्या पूर्ण होईपर्यंत एसटी सेवा बंद ठेवणार असल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. बस कर्मचारी संपावर गेल्याने अनेक प्रवासी विविध बस स्थानकावर अडकले आहेत. बस सेवा लवकर सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.