MAH LLB CET 2024 : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने एलएलबी सीईटीसाठी अर्ज सादर करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या पूर्वी या परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मार्च होती, ती आता १५ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. इच्छुकांना cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर जाऊन परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे.
राज्य CET सेल कार्यालयाला एलएलबीच्या पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी केली होती. त्यामुळे त्यामुळे उमेदवारांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन सीईटी सेलने एलएलबीच्या पाच वर्षांसाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज भरण्यासाठी मुदत ही तिसऱ्यांदा वाढवण्यात आली आहे.
cetcell.mahacet.org वर अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या. होमपेजवर दिसणाऱ्या ‘उमेदवार नोंदणी’ लिंकवर क्लिक करा.
लॉगिन क्रेडेन्शियल्स मिळविण्यासाठी स्वतःची नोंदणी करा.
अर्ज भरण्यासाठी पुढे जा.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज शुल्क भरावे.
सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी फॉर्मची प्रिंटआउट घ्या.
खुल्या गटासाठी तसेच EWS, OMS, अखिल भारतीय, J&K विद्यार्थ्यांसाठी हजार रुपये तर, मागासवर्गीय, अनाथ, ट्रान्सजेंडर व्यक्तिसाठी ८०० रुपये शुल्क आहे.
एमएएच एलएलबी सीईटी २०२४ ही शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालये, संस्था, विद्यापीठांमध्ये पाच वर्षांची एकात्मिक एलएलबी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी ही राज्यस्तरीय निवड प्रक्रिया आहे.