SSC Exam New Rule: महाराष्ट्र बोर्डाने इयत्ता दहावीच्या परीक्षेत बदल केल्याची माहिती समोर आली. विद्यार्थ्यांना यापुढे गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये ३५ ऐवजी २० किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले तरी त्यांना अकरावीत प्रवेश मिळणार आहे. नव्या अभ्यासक्रम आराखड्यात यासंदर्भात तरतूद करण्यात आलीय.
गणित आणि विज्ञान विषय म्हटले की, अनेकांना घाम फुटतो. मात्र, या दोन्ही विषयात कमजोर किंवा आवडत नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने मोठा बदल केला आहे. बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात ३५ गुण आवश्यक असतात. मात्र, यापुढे विद्यार्थ्याने गणित आणि विज्ञानात २० किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवल्यास त्याला उत्तीर्ण केले जाणार आहे. पंरतु, संबंधित विद्यार्थ्याच्या निकालावर एक विशेष शेरा देण्यात येईल. यामुळे विद्यार्थ्यांसमोर प्रमाणपत्र घेऊन अकरावीत प्रवेश घेणे किंवा पुन्हा परीक्षा देणे, असे दोन पर्याय उपलब्ध असतील.
महत्त्वाचे म्हणजे, ज्या विद्यार्थ्यांना गणित किंवा विज्ञान या दोन्ही विषयांवर आधारीत कोणतेही करिअर घडवायचे नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी हा नियम आहे. यामुळे विज्ञान किंवा गणित हे विषय घेऊन उच्च शिक्षण घ्यायचे नाही, अशा विद्यार्थ्यांना फायदा होईल. महाराष्ट्र बोर्डाने दहावीच्या परीक्षेत केलेल्या बदलामुळे अनेकांचे करिअर घडण्यात मदत होईल. गेल्या अनेक वर्षांची सरासरी काढली तर, सर्वाधिक विद्यार्थी गणित आणि विज्ञान अनुतीर्ण होतात.
शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी महाराष्ट्र बोर्डाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांसाठी हा अतिशय घातक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘येत्या काही काळात तंत्रज्ञानाच्या आधारे नोकऱ्या मिळणार आहेत. यासाठी गणित आणि विज्ञान हे दोन्ही विषय महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याऐवजी त्यांना या दोन्ही विषयांची गोडी कशी निर्माण होईल? यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गोष्टी सोप्या करून निकाल वाढवायचे असतील तर, जन्म दाखल्याबरोबर पदवी प्रमाणपत्र द्यावे, अशी माझी सूचना आहे. आपल्याकडे काही पदवीधर आहेत, त्यांना साधा अर्ज देखील लिहिता येत नाही, इतकी वाईट परिस्थिती आहे.’
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार, बारावीचा परीक्षा ११ फेब्रुवारी २०२५ ला सुरू होईल आणि १८ मार्चला संपेल. तर, दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२५ सुरू होणार असून १७ मार्चला संपणार आहे.
संबंधित बातम्या