Maharashtra Soldier Martyred In Punch : भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात लष्कराचे ५ जवान शहीद झाले. तर अनेक जवान जखमी झाले. बलनोई भागात लष्कराचे वाहन जवळपास ३०० फूट दरीत कोसळल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत सातारा जिल्ह्यातील कामेरी गावचे सुपूत्र शुभम घाडगे यांना वीरमरण आले आहे. शुभम घाडगे हे ११ मराठा रेजिमेंटमध्ये आपली सेवा बजावत होते. त्यांच्या मृत्यूमुळे कामेरी गावावर शोककळा पसरली आहे.
जम्मू-काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये हा भीषण अपघात झाला होता. लष्कराचा एक ट्रक तब्बल ३०० फूट खोल दरीत कोसळून मराठा रेजिमेंटचे ५ जवान ठार तर अनेक जण या दुर्घटनेत जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच व्हाईट नाईट कॉर्प्सच्या जवानांनी मदत व बचाव कार्य सुरू केले होते.
साताऱ्यातील कामेरी गावचे सुपूत्र असलेले शुभम घाडगे यांच लहानपणापासून लष्करात भरती होण्याचं स्वप्न होतं. त्यांचं प्राथमिक येथील शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं. तर महाविद्यालयीन शिक्षण छत्रपती शिवाजी कॉलेज अपशिंगे मिलिटरी येथे पूर्ण केलं. यानंतर ते भारतीय सैन्य दलात भरती झाले. कामेरी, अपशिंगे मिलिटरी येथील अनेक तरुण लष्करात सेवा बजावत आहेत. शुभम घाडगे यांच्या मृत्यूची बातमी येताच गावावर शोककळा पसरली.
या अपघाताला दोन दिवस झाले आहे. शुभम यांच्या मागे त्यांची आई-वडील, पत्नी, मुलगी, भाऊ, असा परिवार आहे. अद्याप शुभम यांचे पार्थिव गावात आले नसून त्यांच्या पार्थिवाची प्रतिक्षा ग्रामस्थांना आहे.
शुभम यांचे पार्थिव बेळगावहून वाहनाने कोल्हापूर मार्गे कामेरी येथे सकाळी १० वाजेपर्यंत आणण्यात येणार आहे. त्यांचे पार्थिव घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर तीन वाजताच्या सुमारास अंत्ययात्रेला सुरुवात होऊन ४ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
या अपघातात चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील पिंपळगाव येथील जवान अक्षय निकुरे यांलाही वीरमरण आले आहे. निकुरे यांच्या पार्थिवावर आज गुरुवारी शासकीय इतमामात गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
संबंधित बातम्या