Uddhav Thackeray News: ‘शिवसेनेला व ठाकरे कुटुंबीयांना अनेक प्रकारे त्रास दिला जातोय. मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीसने डाव रचले होते हे स्वत: अनिल देशमुखांनी सांगितलं. हे सगळं सहन करून मी हिंमतीनं उभा राहिलो. आता एकतर तू तरी राहशील, नाहीतर मी तरी राहीन,' असं खुलं आव्हान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं.
मुंबईतील रंगशारदा सभागृहात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. मागच्या काही वर्षांत शिवसेनेसोबत झालेल्या कुटील राजकारणाचा पाढा त्यांनी वाचला. तसंच, भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी एकेरी भाषेत जोरदार टीका केली.
'कुरुक्षेत्रावर नातेवाईकांना समोर पाहून अर्जुनाला वाईट वाटलं. कालपर्यंत माझ्यासोबत असलेले माझ्या घरावर चालून येतायत हे पाहून मला यातना होत नसतील? पण मी एका तडफेनं उभा राहिलेलो आहे. माझ्याकडं अधिकृत पक्ष नाही, चिन्ह नाही. पैसा नाही. पण मी केवळ शिवसैनिकांच्या बळावर आवाज देऊ शकतो. मी म्हणजे शिवसैनिक आहेत. दिल्लीच्या उरात धडकी माझ्या शिवसैनिकांमुळं भरली आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सुनावलं. 'लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाम फोडला आता विधानसभा निवडणुकीत भाजपाची उरली सुरली गुरमी उतरवू, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरही त्यांनी भाष्य केलं. 'हा लढा शिवसेनेच्या अस्मितेचा नसून मुंबईच्या अस्तित्वाचा आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाची उरली सुरली गुरमीही उतरवू. हातात भिकेचा कटोरा घेऊन तुम्हाला आमच्यासमोर यावे लागेल. या लोकांविरोधात बोलण्याची कोणाची हिंमत नव्हती पण आम्ही बोललो. आम्ही असेच आहोत. सत्ताधारी पक्षात बसलेले हे लोक राजकारणात नपुंसक आहेत. त्यांनी आमचा पक्ष तोडला पण आम्ही झुकलो नाही. विधानसभा निवडणूक ही आपली शेवटची लढाई आहे. निवडणुकीत जिंकलो तर या देशात आम्हाला कोणी आव्हान देऊ शकणार नाही', असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘अजूनही काही लोकांना फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्यांना पक्ष सोडायचा आहे, त्यांनी उघडपणे जावे, पण आमच्यासोबत राहून विश्वासघात करू नये. शिवसैनिकांना सोबत घेऊन मी लढाई जिंकेन,’ असं उद्धव ठाकरे यांनी कुंपणावर असलेल्या नगरसेवकांना सुनावलं.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी एका प्रचारसभेत मोठ्या संख्येनं मुस्लिम आले होते. तिथं मी जाहीरपणे त्यांना प्रश्न केला की मी हिंदुत्व सोडलंय का? त्यांनी नकारार्थी उत्तर दिलं आणि तुमचं हिंदुत्व आम्हाला मान्य असल्याचंही सांगितलं. ख्रिश्चन आणि इतर समाजही आपल्यासोबत येत आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्ही माझ्याकडून सर्व काही हिसकावून घ्या, पण आम्ही तुमच्या नाकावर टिच्चून सत्तेत येऊ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबईच्या विकासाठी महापालिका पुरेशी आहे. एमएमआरडीएची गरज नाही. आम्ही सत्तेत आल्यास एमएमआरडीए बंद करणार. तसंच, सर्वप्रथम धारावीची निविदा रद्द करणार, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. 'सर्वोच्च न्यायालयात आमचा खटला सुरू आहे, मला माझ्या पक्षाचं 'शिवसेना' हे नाव हवं आहे. असं होत नाही तोपर्यंत मशालीचा प्रचार करा आणि मशाल प्रत्येक घराघरात पोहोचवा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.
संबंधित बातम्या