Uddhav Thackeray News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल महाविकास आघाडीसाठी धक्कादायक ठरला. लोकसभा निवडणुकीत अपयशी ठरलेल्या महायुतीने विधानसभेत जोरदार मुसंडी मारत २३० जागांवर विजय मिळवला. नुकतीच शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवनिर्वाचित आमदारांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षातील विजयी उमेदवार आणि राज्यभरातील शिवसैनिकांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
लोकसभा निवडणुकीत मोठी कामगिरी बजावणाऱ्या ठाकरे गटाला विधानसभा निवडणुकीत मात्र अपयश आले. या निवडणुकीत ठाकरे गटाचे एकूण २० आमदार निवडून आले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी नुकतीच आपल्या निवासस्थानी मातोश्री येथे विजयी उमेदवारांची बैठक बोलावली. या बैठकीत नवनिर्वाचित आमदारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ते फडणवीस असले तरी आपण २० आहोत, आपण पुरून उरू, असा कानमंत्री त्यांनी आपल्या पक्षातील आमदार आणि राज्यभरातील कार्यकर्त्याला दिला. यावेळी त्यांनी विजयी आमदारांना मार्गदर्शनही केले.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ५६ जागांवर विजय मिळवलेल्या उद्धव ठाकरेंना यावेळी फक्त २० जागा जिंकता आल्या. तर, एकनाथ शिंदे गटाच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला ५७ जागा मिळाल्या. अशा तऱ्हेने आधीच पक्षाचे नाव आणि चिन्ह गमावलेल्या उद्धव ठाकरे यांची एकनाथ शिंदे गटाने चिंता वाढवली आहे. ठाकरे गटातील अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचे शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी म्हटले. या शिंदे गटाच्या या दाव्यानंतर ठाकरे गट सतर्क झाल्याचे मानले जात आहे.
मातोश्रीवर झालेल्या बैठकीतही यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असून भास्कर जाधव यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. म्हणजेच जाधव विधानसभेत पक्षाचे नेतृत्व करतील. याशिवाय आदित्य ठाकरे यांना मोठी जबाबदारी देत त्यांची विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही पक्षांच्या नेतेपदी निवड करण्यात आली. सुनील प्रभू हे सभागृहात पक्षाचे मुख्य सचेतक राहतील.
एकनाथ शिंदे गटाचे म्हणणे आहे की, उद्धव ठाकरे यांनी भीतीपोटी ही बैठक बोलावली. कारण त्यांचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे त्या आमदारांकडून प्रतिज्ञापत्र घेण्यात आले. उद्धव गटाला मोठा धक्का बसला असून निवडणूक निकालानंतर संजय राऊत यांनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले आहेत. एकनाथ शिंदे यांचे सर्व आमदार कसे जिंकत आहेत? निकालावर माझा विश्वास नाही आणि काही तरी गडबड झाली असावी. इतकेच नाहीतर, हा निकाल आश्चर्यकारक असून त्यामागील सत्य शोधू, असे विरोधी पक्षातील नेते बोलत आहेत.