Ladki Bahini Yojana: महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेंतर्गत अनेक पात्र महिलांच्या खात्यात पैसे देखील जमा झाले आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेऊन लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे आगाऊ पैसे देण्यात येत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मात्र, ही योजना महिनाभर चालेल मग बंद होईल अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यामागचे कारणही सांगितले आहे.
महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांची दिशाभूल करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. अशातच संजय राऊत यांनीही या योजनेबाबत आपले मत मांडले आहे. 'देशाच्या कोणत्याही भागात बहीण लाडकी योजना यशस्वी ठरली नाही. हा फक्त राजकीय खेळ आहे. देशात सर्वात प्रथम मध्य प्रदेशात ही योजना सुरू करण्यात आली. मात्र, ही योजना अपयशी ठरली आहे. या योजनेमुळे राज्याची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. महाराष्ट्र सरकारवर हजारो लाखांचे कर्ज आहे. राज्यात बहीण लाडकी योजना महिनाभर चालेल, त्यानंतर बंद होईल', असे संजय राऊत म्हणाले. दरम्यान, संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या वक्तव्यावर विरोधक कोणती प्रतिक्रिया देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांना धडकी भरली आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेऊन लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे आगाऊ पैसे देण्यात येत आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर महिला लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत मासिक मदत मिळण्यात विरोधी पक्ष अडथळे निर्माण करू शकतात. यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले.
या योजनेअंतर्गत अडीच लाखरुपयांपेक्षा कमी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या महिलांना दरमहा १५०० रुपये मदत म्हणून मिळतात. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या अनेक महिलांच्या बँकेच्या खात्यात या महिन्यात तिसरा हफ्ता जमा झाला आहे. तर, १० ऑक्टोबरपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.