मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Manohar Joshi: माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन, राजकीय वर्तुळातून शोक

Manohar Joshi: माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन, राजकीय वर्तुळातून शोक

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 23, 2024 10:26 AM IST

Sharad Pawar On Manohar Joshi Death: मनोहर जोशी यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.

Manohar Joshi Dies
Manohar Joshi Dies

Former Maharashtra CM Manohar Joshi dies at 86: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज (२३ फेब्रुवारी २०२४) पहाटे ०३.०० वाजताच्या हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मनोहर जोशी यांना गुरुवारी रात्री अत्यवस्थ वाटू लागल्याने मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मनोहर जोशी यांच्या रुपात महाराष्ट्रातील जनतेने मोठा नेता गमावला आहे. त्यांच्या निधानाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार गटाचे जेष्ठ नेते शरद पवार शोकाकूळ झाले आहेत. शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहताना शरद पवार म्हणाले की, "शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. स्पष्टोक्ती आणि धडाडीने काम करण्याची वृत्ती या व्यक्तिगुणांनी राजकीय वर्तुळात त्यांची ओळख होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी मनोहर जोशी यांची ओळख होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भुषवताना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन राज्याच्या विकासासाठी परिश्रम घेतले. लोकसभेच्या अध्यक्ष पदी असताना संसदेच्या प्रांगणात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात त्यांची प्रमुख भुमिका होती. मी जोशी कुटूंबीयांप्रती माझ्या सहसंवेदना व्यक्त करतो."

"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान, विश्वासू सहकारी अशी जोशी सरांची ओळख होती. शिवसेना पक्षस्थापनेपासून पक्षसंघटनेत त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या. विधान परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. मुंबईचे महापौर म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखनीय, संस्मरणीय ठरली. शिवसेना भाजपच्या युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जोशी सरांना दिली. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा महाराष्ट्रात उमटवला. दिल्लीच्या राजकारणात केंद्रीय अवजड उद्योगमंत्री म्हणून त्यांनी काम केले. लोकसभेचे अध्यक्ष म्हणून नि:ष्पक्ष भूमिका त्यांनी बजावली. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या जोशी सरांनी स्वकर्तृत्वावर लोकसभेच्या अध्यक्षपदापर्यंत मजल मारली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या प्रत्येक संधीचे त्यांनी सोने केले. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासू, सुसंस्कृत नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. कोहिनूर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरीव काम केले. अनेक मराठी तरुणांना उद्योगक्षेत्रातील संधींसाठी प्रशिक्षित केले. मराठी माणूस आणि महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील. ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या कुटुंबियांच्या, कार्यकर्त्यांच्या, नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत", अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

Manohar Joshi : भिक्षुकी, शिपाई ते मुख्यमंत्री व लोकसभा सभापती, असा होता मनोहर जोशींचा थक्क करणारा जीवनप्रवास

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभेचे माजी अध्यक्ष श्री मनोहर जोशी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. माझा त्यांचा वैयक्तिक ऋणानुबंध होता. नगरसेवक ते महापौर, आमदार ते मुख्यमंत्री आणि खासदार ते लोकसभाध्यक्ष असे सर्व टप्पे त्यांनी आपल्या राजकीय जीवनात पूर्ण केले. विधानसभा आणि विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहात प्रतिनिधीत्त्व करण्याचा मान त्यांनी मिळविला. अतिशय शिस्तबद्ध, संयमी आणि अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख होती. वैयक्तिक जीवन असो की राजकीय जीवन वेळेची शिस्त त्यांनी कधी सोडली नाही. महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान कधीच विस्मरणात जाणार नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे.

"मनोहर जोशी सरांचं निधन झालं. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून त्यांच्या सोबतच्या पहिल्या फळीतील ते ज्येष्ठ नेते. शिवसेनेची धाटणीच आक्रमक, पण त्यात अजातशत्रुत्व जपत सरांची राजकीय वाटचाल सुरु राहिली. शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं जे मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण झालं. पुढे ते लोकसभा अध्यक्ष झाले आणि नंतर शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे सैनिक म्हणून राहिले. १९६६ पासून शिवसेनेचा धगधगता इतिहास पाहिलेले आणि जगलेले एक शिवसैनिक, नेते आज काळाच्या पडद्याआड गेले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनोहर जोशी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली", अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शोक व्यक्त केला.

Manohar Joshi Passed Away: कडवे शिवसैनिक व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन

मनोहर जोशी हे दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. तर, तीन वेळा विधानपरिषद सदस्य झाले. १९९५- १९९९ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भुषवले. त्यानंतर १९९९- २००२ दरम्यान त्यांनी केंद्रात अवजड उद्योगमंत्री म्हणून काम पाहिले. पुढे २००२ मध्ये ते लोकसभा अध्यक्ष झाले. २००६- २०१२ दरम्यान ते लोकसभेचे अध्यक्ष होते.

WhatsApp channel