Elephant Attack News: गडचिरोलीतील (Gadchiroli) मुटनूर गावात (Mutnur Village) जंगली हत्तीच्या हल्ल्यात २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी (२४ ऑक्टोबर २०२४) घडली. मृत तरुण हत्तीच्या जवळून सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होता. तितक्यात हत्तीने त्याच्यावर हल्ला केला. वन अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. या घटनेने परिसरात भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.
शशिकांत सत्रे (२४) असे मृताचे नाव असून गडचिरोली येथील मुटनूर गावचा रहिवासी आहे. तो काही कामानिमित्त जंगल परिसरात गेला असता, तिथे त्याला हत्ती दिसला. त्याला हत्तीसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. सेल्फी काढण्यासाठी तो हत्तीजवळ गेला. मात्र, तितक्यात हत्तीने त्याच्यावर हल्ला करून त्याला पायाखाली चिरडले. या घटनेची माहिती मिळताच वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आला.
वन अधिकारी गेल्या काही दिवसांपासून तरुणावर हल्ला केलेल्या हत्तीवर लक्ष ठेवून होता. हा हत्ती कळपात राहत नसून एकटाच फिरायचा, असे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या दिवशी ही घटना घडली, तेव्हा एक वन अधिकारी घटनास्थळी उपस्थित होता. मात्र, वन अधिकारी आणि मृत तरुण काही अंतरावर असल्यामुळे ते मदत करू शकले नाहीत. वन्यजीव कायद्यांतर्गत मृतांच्या नातेवाइकांना संपूर्ण नुकसान भरपाई मिळेल, अशीही माहिती समोर येत आहे.
गडचिरोलीत वन्य प्राण्यांनी स्थानिक नागरिकांवर हल्ला केल्याची ही पहिली घटना नाही.गडचिरोलीत घनदाट जंगल आहे. त्यामुळे नेहमीच वन्य प्राणी रस्त्यावर वावरताना दिसतात.नुकत्याच घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
असाममध्ये एका गेंड्याने एका दुचाकीस्वारावर जीवघेणा हल्ला केल्याची गेल्या महिन्यात घडली, ज्यात संबंधित व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ आसाममधील मोरीगाव जिल्ह्यातील पोबिटोरा वन्यजीव अभयारण्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना रविवारी (२९ सप्टेंबर २०२४) घडली. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, स्त्याच्या मधोमध गेंडा उभा आहे. गेंड्याला पाहून काही लोक घाबरून रस्त्याच्या एका बाजूला उभा आहेत. तर, दुसऱ्या बाजूला दुचाकीस्वार उभा आहे. जेव्हा गेंड्यांनी दुचाकीस्वारवर हल्ला केला,जीव वाचवण्यासाठी त्याने शेतात धाव घेतली. परंतु, गेंड्याने त्याचा पाठलाग करून त्याच्यावर हल्ला केला. लोकांनी ओरडाओरडा करून गेंड्याला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. गेंड्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वारचा मृत्यू झाला. सुद्दाम हुसेन असे गेंड्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
संबंधित बातम्या